छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:36 IST2021-12-20T19:33:12+5:302021-12-20T19:36:30+5:30
OBC Reservation : छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिले आरक्षण दिले ते मराठा समाजाचे होते. नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेले.

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते : महादेव जानकर
गंगाखेड (जि. परभणी)- छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते, ते कुळवाडीभूषण राजा होते. त्यावेळी काही तथाकथित लोकांना आपण गावचे खूप मोठे आहोत, मग आरक्षण कशाला म्हणून आरक्षण नको वाटले. आज काय अवस्था झालीय पहा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेन जानकर ( Mahadev Jankar ) यांनी गंगाखेड येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
गंगाखेड येथे विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने १३ डिसेंबरपासून ओबीसी आरक्षणासाठी ( OBC Reservation ) एल्गार आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनास सोमवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्य लोकांना आपली विनंती आहे की, आमचे ३०-३५ आमदार येऊ द्या, दहा मिनिटांत ओबीसींची किंमत करून दाखवतो. मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देतो. मुस्लिम समाजावर तर किती अन्याय झालायं पहा, गॅरेज, अंड्याचे दुकान, कोंबडीचे दुकान पाहिले की तेथे मुस्लिम दिसतात. त्यांचा कुठेही डाटा नाही. काही नाही, सगळी बोंबाबोंब. हिंदू भिकारी आणि मुस्लिमही भिकारी आणि राज्य चालविणारा तर तिसराच मालक असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिले आरक्षण दिले ते मराठा समाजाचे होते. नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते, ते कुळवाडीभूषण राजे होते. त्यावेळी काही तथाकथित लोकांना वाटले की आम्ही गावचे खूप मोठे आहोत. मग आरक्षण कशाला? नकोय आरक्षण, म्हणाले. अन् आज काय अवस्था झाली ते पहा, असेही जानकर म्हणाले.
भाजपा- काँग्रेस एकच
यावेळी महादेव जानकर यांनी भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षावर टिका केली. हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपाचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता; परंतु, त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठविला. ओबीसी बाबत बोललं की सपंवलं जातय, असा आरोपही यावेळी जानकर यांनी केला. काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांना ओबीसीचा डाटा द्यायचा नाही. आम्ही काय भाजपाचे चेले किंवा काँग्रेसचे दलाल नाही. त्यामुळे ओबीसीच्या बाबतीत जेव्हा आवाज उठवायचा असेल तेव्हा आवाज उठवू, असेही जानकर म्हणाले.