पीकविमा कंपनीचा अनागोंदी कारभार - बोर्डीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:58+5:302021-07-16T04:13:58+5:30
परभणी येथील कृषी कार्यालयास गुरुवारी आमदार मेघना बोर्डीकर यांनी भेट देऊन येथील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर पत्रकारांना त्या ...

पीकविमा कंपनीचा अनागोंदी कारभार - बोर्डीकर
परभणी येथील कृषी कार्यालयास गुरुवारी आमदार मेघना बोर्डीकर यांनी भेट देऊन येथील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर पत्रकारांना त्या म्हणाल्या की, पीकविमा कंपनीच्या तक्रारीसाठी संपूर्ण राज्यासाठी एकच नंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडता येत नाहीत. प्रत्येक जिल्ह्यासाठी तक्रारीसाठी स्वतंत्र नंबर असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विमा कंपनीचे कोणतेही कार्यालय सुरू नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पीकविमा कुठे भरावा, याची माहिती मिळत नाही. शिवाय याबाबत तक्रार कोणत्या पोर्टलवर करायची हेदेखील विमा कंपनीने कळविलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यामध्ये जागोजागी वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या विमा भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे अधिक नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करण्याची मागणी आपण केली आहे. तसेच जिल्ह्यात ऑनलाईन पीक विमा भरताना साईट वेळोवेळी बंद पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून पीकविमा भरण्याची अंतिम तारीख वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रंगनाथ सोळंके, उद्धवराव नाईक, सुरेश भुमरे, अरुण गवळी, आदींची उपस्थिती होती.