रेमडेसिविरच्या काळ्याबाजारातील विक्रीसाठी साखळी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST2021-04-22T04:17:47+5:302021-04-22T04:17:47+5:30
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकून पैसे कमाविण्याच्या दोन घटना परभणी शहरात महिनाभरात उघडकीस ...

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारातील विक्रीसाठी साखळी ?
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकून पैसे कमाविण्याच्या दोन घटना परभणी शहरात महिनाभरात उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांत गुन्हे दाखल झाले? आहेत. असे असले तरी या गुन्ह्यांच्या मुळाशी पोलिसांना जावे लागणार आहे. कोरोनामुळे एकीकडे जनता हैराण असताना गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या प्रवृत्तीला चव्हाट्यावर आणण्याचे पोलीस प्रशासनाचे काम आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे प्रकार घडत आहेत. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेनेच सात रेमडेसिविर इंजेक्शन चोरून विकल्याची कबुली पोलिसांना दिली. असे असले तरी सदरील महिला कर्मचाऱ्यास चोरीचे धाडस कसे काय झाले? त्यामागे आणखी कोण आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सखोल चौकशीची ‘प्रहार’ची मागणी
जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने एका खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने रेमडेसिविर इंजेक्शन विकण्याचा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शासकीय सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याकडे बेकायदेशीर रेमडेसिविर इंजेक्शन भेटणे व ते अनेकांना विकल्याची कबुली देणे हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. कुठल्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याशिवाय एखादा कर्मचारी एवढे मोठे धाडस करू शकत नाही. यामागे एक-दोन कर्मचारी नसून, एक मोठे रॅकेट काम करीत असावे, अशी शंका निर्माण होत आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले, त्या रुग्णांचे केसपेपर तपासावे. तसेच सर्व कोविड रुग्णालयांतील स्टॉक रजिस्टर व इंजेक्शनचे बॅच नंबर तपासावे. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निगराणीत तपास पथक नियुक्त करून सखोल चौकशी करावी, असेही या निवेदनात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी म्हटले आहे.