बेडवरुन उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाऊ शकते लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:50+5:302021-07-27T04:18:50+5:30
कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत ...

बेडवरुन उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाऊ शकते लस !
कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गंभीर आजाराचे अनेक रुग्ण बेडवर खिळून आहेत. या रुग्णांना लस घेण्यासाठी केंद्रावर येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी काही तरी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात बेडवर खिळून असणाऱ्या रुग्णांची माहिती शासनाने मागविली आहे. या रुग्णांना भविष्यात घरी जाऊन लस देणे, हाच माहिती मागविण्यामागचा उद्देश असावा. त्यामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या रुग्णांना घरी लस मिळू शकते.
घरी लसीकरणाच्या सूचना मात्र नाहीत
शासनाने जिल्ह्यातील आरोग्य विभागाला बेडवर खिळून असणाऱ्या रुग्णांची माहिती मागविली आहे. मात्र, ही माहिती नेमकी कशासाठी मागविली, याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. सध्या लसीकरणाचा विषय सुरू असून, बेडवर खिळून असलेल्या रुग्णांचा विषय लसीकरणाच्या अनुषंगाने न्यायालयात समोर आला होता. त्यामुळे आरोग्य विभागाकडे मागविलेली माहिती भविष्यात या रुग्णांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भातच असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील आरोग्य विभागाने शासनाच्या निर्देशानुसार माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. हे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात असे किती रुग्ण आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
हायरिस्कमध्ये कोण?
हायरिस्क रुग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. या रुग्णांमध्ये जे अंथरुणावर खिळून आहेत. ज्यांना उठताही येत नाही. अशाच रुग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. इतर रुग्णांच्या बाबतीत मात्र विचार झालेला नाही.
शासनाने बेडरिडन (अंथरुणावर खिळून असलेले) रुग्णांची संख्या आणि माहिती मागविली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे अशा रुग्णांचा एकत्रित आकडा उपलब्ध नाही.
- डॉ. रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख