१५ व्या वित्त आयोगातून फॉगिंग मशीन खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:28+5:302021-06-10T04:13:28+5:30
परभणी : १५ व्या वित्त आयोगातून फॉगिंग मशीन आणि पाच लीटर अबेट ग्रामपंचायतींनी खरेदी करून साथरोग प्रतिबंधक उपाय योजना ...

१५ व्या वित्त आयोगातून फॉगिंग मशीन खरेदी करा
परभणी : १५ व्या वित्त आयोगातून फॉगिंग मशीन आणि पाच लीटर अबेट ग्रामपंचायतींनी खरेदी करून साथरोग प्रतिबंधक उपाय योजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांसंदर्भात तयारी करण्याच्या दृष्टीने नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. पावसाळ्यात साथीचे रोग वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगातून फॉगिंग मशीनची खरेदी करावी, त्याचप्रमाणे टीसीएलचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा, गप्पी मासे पैदास केंद्र तयार करावे, अशा सूचना टाकसाळे यांनी यावेळी केल्या. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही.आर. पाटील यांनी हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने माहिती दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, कंटेनर सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे आदी कामे करावीत, अशा सूचना दिल्या.
पावसाळ्यामध्ये साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. तेव्हा नागरिकांनीही आठवड्यापेक्षा अधिक दिवस पाणी साठवून ठेवू नये, किमान दोन वेळेस पाणीसाठे रिकामे करून त्यानंतरच पाणी भरावेत, या संदर्भाने ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सर्वेक्षणावर भर द्यावा, एकही घर सर्वेक्षणातून सुटणार नाही यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना सभापती अंजलीताई आणेराव यांनी दिल्या आहेत.