लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमासाठी अधिकारीच वेळेवर उपस्थित न राहिल्याने या कार्यक्रमासाठी आलेल्या अल्पसंख्याक घटकातील नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.१८ डिसेंबर रोजी जिल्हाभरात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातून एक परिपत्रक काढून अल्पसंख्याक हक्क दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अल्पसंख्याक घटकातील नागरिकांना केले होते. उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या सहीनिशी हे पत्र देण्यात आले. त्यानुसार मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आदी अल्पसंख्याक घटकातील २५ ते ३० नागरिक सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले. एक तास वाट पाहूनही अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित झाले नाहीत. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांचा अपवाद वगळता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यापैकी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने अल्पसंख्याक घटकातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.प्रशासनाच्या उदासिनतेचा निषेध केला आणि या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न त्यावर करावयाच्या उपाययोजना या अपेक्षेने नागरिक कार्यक्रमास उपस्थित राहिले. मात्र त्यांना भ्रमनिरास झाला.दुपारी पार पडला कार्यक्रमदरम्यान, दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांनी शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्योती बगाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिव शंकर म्हणाले, अल्पसंख्यांक मुलींचा शिक्षणात टक्का वाढावा या करीता मुलींना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन दिली असून, त्या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
परभणीत अल्पसंख्याकांचा कार्यक्रमावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:34 IST