मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द
By मारोती जुंबडे | Updated: February 6, 2025 18:17 IST2025-02-06T18:02:31+5:302025-02-06T18:17:41+5:30
बोगस विमा प्रकरण: केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात.

मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द
परभणी: जिल्ह्यात १३ हजार शेतकऱ्यांचा नावे ३० हजार हेक्टरवरील पिकांचा विमा बोगस भरला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १२१ सीएससी केंद्रावर कार्यवाही करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार प्रशासनाने या १२१ आपले सरकार सेवा केंद्रांचा परवाना रद्द केला आहे.
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षित करतात. दोन वर्षापासून राज्य शासनाने सर्व समावेशक पीक विमा योजना अमलात आणली. त्यामुळे जिल्ह्यात पिकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून आपली पिके विमा कंपनीकडे संरक्षित करता येऊ लागली आहेत. मात्र दुसरीकडे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात आले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात १३ हजार शेतकऱ्यांचा जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील विमा हा बोगस भरला असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली. कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे या १२१ आपले सरकार सेवा केंद्रातून हा विमा भरला आहे. त्यामुळे बोगस विमा भरल्याप्रकरणी या केंद्रांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने १२१ केंद्रांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे सीएससी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहावे ते नवलच; पर जिल्ह्यातील ५८ केंद्र
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात १३ हजार शेतकऱ्यांच्या नावे ३० हजार हेक्टरवरील पिकांचा विमा बोगस काढल्याचे समोर आले. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे परभणी जिल्ह्यापेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातील तब्बल ५८ केंद्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक बीड, नांदेड, पुणे, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, चंद्रपूर, जालना, सातारा, ठाणे, कल्याण या जिल्ह्यातील सीएससी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला.
परभणी जिल्ह्यातील ४४ केंद्र केले ब्लॉक
परभणी जिल्ह्यामध्ये प्रशासनाने ४६८८ आपले सरकार सेवा केंद्राची नोंदणी केली. त्यापैकी जिल्ह्यात २५६८ केंद्र सध्या सुरू आहेत. यातील ४४ केंद्रांनी बोगस विमा भरल्याचे समोर आले. या केंद्रांवर सीएससीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला.
गैरप्रकार केला तर परवाना रद्द
‘‘पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत बोगस विमा भरल्याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने १२१ केंद्रांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर या केंद्रांचा वरिष्ठांच्या सूचनेनुसार परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढे एखाद्या केंद्राने गैरप्रकार केला तर त्याचा परवाना रद्द केला जाणार आहे.
- सोमनाथ तवार,जिल्हा व्यवस्थापक सीएससी केंद्र