पालम : शेतात चारा टाकण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीचा मृतदेह १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पालम तालुक्यातील गणेशवाडी शिवारात आढळला आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दोघांच्याही मृत्यूचे नेमके कारण काय, याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे यांनी दिली.
पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील शेतकरी नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय ४० वर्षे) व त्यांची मुलगी वैष्णवी नागनाथ बल्लोरे (१४) अशी मयतांची नावे आहेत. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागनाथ बल्लोरे व त्यांची मुलगी वैष्णवी हे दोघे शेतातील आखाड्यावर बैलांना चारा टाकण्यासाठी गेले होते. ते उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यामुळे घरातील सदस्यांनी शेताकडे धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा शेतातील विहिरीजवळ नागनाथ बल्लोरे यांचा मोबाइल आणि चप्पल आढळली. त्यावरून विहिरीत पाहणी केली असता विहिरीत ६० फूट पाणी असल्याने काहीही आढळले नाही. त्यामुळे पाच मोटारी लावून विहिरीचे पाणी उपसण्यात आले. तेव्हा १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता नागनाथ बल्लोरे व वैष्णवी बल्लोरे यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात आढळला. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पालम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद साने तपास करीत आहेत.
रात्रीच पोलिसांनी घेतली धाव
गणेशवाडी येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालम पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद साने यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस अधिकारी बराच वेळ घटनास्थळी होते. मात्र विहिरीत पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास बराच वेळ लागत असल्याने सोमवारी सकाळपासून शोधकार्य सुरू करण्यात आले.