अपहत मुलाचा मृतदेह मन्नाथ तलावात आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:01+5:302021-05-11T04:18:01+5:30
शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात पत्नी, दोन मुली व एका मुलासोबत राहत असलेले विठ्ठल रामराव डुबुकवाड ८ मे रोजी सकाळी ...

अपहत मुलाचा मृतदेह मन्नाथ तलावात आढळला
शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात पत्नी, दोन मुली व एका मुलासोबत राहत असलेले विठ्ठल रामराव डुबुकवाड ८ मे रोजी सकाळी पत्नीला डबा देण्यासाठी अल्पसंख्याक मुलींच्या वसितगृहात गेले होते. तेव्हा शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घराबाहेर गेलेला त्यांचा मुलगा संग्राम विठ्ठल डुबुकवाड (वय १५) हा रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आला नसल्याने रविवारी, ९ मे रोजी विठ्ठल डुबुकवाड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सकाळी शहरापासून जवळच असलेल्या मन्नाथ तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि राजेश राठोड, जमादार मारोती माहोरे, पोलीस शिपाई योगेश सूर्यवंशी, जगन्नाथ मुंडे आदींनी मन्नाथ तलावाकडे घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाण्यात असलेला मृतदेह बाहेर काढला असता हा मृतदेह ८ मे रोजी बेपत्ता झालेल्या संग्राम डुबुकवाड या पंधरा वर्षीय अपहृत मुलाचा असल्याचे तलावाबाहेर असलेल्या कपड्यावरून स्पष्ट झाले. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मन्नाथ तलावात मृतदेह तरंगत असल्याची माहिती समजल्याने तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोहण्यासाठी गेल्यानंतर मन्नाथ तलावातील पाण्यात बुडून संग्राम डुबुकवाड या मुलाचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज घटनास्थळी जमलेल्या नागरिकांतून वर्तविला जात होता.