सेलू बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कामकाजातील अनियमितता भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 15:59 IST2021-01-20T15:56:38+5:302021-01-20T15:59:44+5:30
Selu Market Committee dismissed जिल्हा उपनिबंधकांनी दिले आदेश

सेलू बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कामकाजातील अनियमितता भोवली
सेलू :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनियमित आढळून आल्याने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. यासंबंधी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी १९ जानेवारी रोजी आदेश दिले आहेत.
येथे बाजार समीतीच्या संचालक मंडळाने परवानगी न घेता भूखंड वाटप, मोंढ्यातील गाळयाचे विना परवानगी बांधकाम करणे, बाजार समितीची माती परिक्षण यंञ सामग्री महाविद्यालयास देणे, वालूर उप बाजार पेठेतील गाळे खाजगी शिक्षण संस्थाला विनापरवानगी देणे आदी बाबी उघडकीस आल्या होत्या. या संदर्भात माजी आमदार विजय भांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माऊली ताठे आणि सचीन हिवरे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहाय्यक उपनिबंधक यांच्या समितीने याची चौकशी केली असता अनियमिता झाल्याचा अहवाल दिला. तसेच सन २०१८- २०१९ झालेल्या लेखा परिक्षणातही अनियमिता आढळून आली होती. या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी झाली. यानंतर १९ जानेवारी रोजी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी दिले. यानंतर बुधवारी मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक माधव यादव यांनी बाजार समीतीचे सुञे हाती घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष
बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदधिका-यानी शहरात फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम पावडे, अजय डासाळकर, नबाजीराव खेडेकर , आप्पासाहेब रोडगे, तुकाराम रोडगे, रघुनाथ बागल, दिलीप आकात आदी उपस्थित होते.