बर्ड फ्लू संक्रमण ; केंद्राचे चार सदस्यीय पथक परभणी जिल्ह्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 19:02 IST2021-01-20T19:01:21+5:302021-01-20T19:02:21+5:30
Bird flu तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बर्ड फ्लू संक्रमण ; केंद्राचे चार सदस्यीय पथक परभणी जिल्ह्यात दाखल
परभणी : बर्ड फ्लू संसर्ग व इतर माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल झाले असून, परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे भेट देऊन आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा या पथकाने घेतला.
तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अहवालानंतर संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना या भागात राबविण्यात आल्या. मुरुंबा परिसरासह सेलू तालुक्यातील कुपटा येेथील कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्यात आले. त्याचप्रमाणे, या भागातील पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, तसेच पशुसंवर्धन विभागाने या प्रतिबंधक उपाययोजना केल्या.
दरम्यान, जिल्ह्यात संसर्ग झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी सोमवारी केंद्र शासनाचे ३ सदस्यीय पथक परभणीत दाखल झाले. या पथकात दिल्ली येथील सार्वजनिक आरोग्यसेवा सल्लागार समितीचे डॉ.सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ.मनोहर चौधरी, तसेच औरंगाबाद येथील डॉ.प्रदीप मुरुंबीकर यांचा समावेश आहे. मुरुंबा येथे या पथकाने भेट दिली. त्याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.व्ही.आर. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.लोणे, पशुधन विकास अधिकारी डॉ.कीर्ती तांबे, डॉ.प्रकाश सावणे, डॉ.पवन सोळंके आदींची उपस्थिती होती. मंगळवारी पथकातील सदस्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठालाही भेट दिली.