- राजन मंगरुळकरपरभणी : सर्वोच्च न्यायालय दिल्ली, यांनी विशेष अनुमती याचिका क्रं ९८८३-२०२५ मधील ३० जुलै २०२५ रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे आणि मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या १८ डिसेंबर २०२५ च्या अर्जावरून दिलेल्या फिर्यादीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात शुक्रवारी मध्यरात्री नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी याबाबत न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ही प्रक्रीया झाली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेल्या औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नसून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
परभणीत १० डिसेंबरला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना घडली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनादरम्यान ११ डिसेंबरला शहरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. या घटनेदरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास नवा मोंढा पोलिस ठाण्यात नेले होते. यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा १५ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. मयत सोमनाथ यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांना परभणी पोलिसांनी १५ डिसेंबरला सकाळी सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये पुढे विविध ठिकाणच्या तपास प्रक्रीया, शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय तज्ञ अहवाल तसेच न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाल्या होत्या. हे प्रकरण देशभरात गाजले होते. यावर देशपातळीपासून ते राज्य पातळीवरील सर्व पक्षांचे नेते परभणीत आले होते. परभणी येथून मुंबईपर्यंत लाँग मार्च सुध्दा निघाला होता. शुक्रवारी मध्यरात्री दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश आल्यावर पुढे झाली प्रक्रीयाबुधवारी दिलेल्या आदेशानंतर अखेर सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकाल कायम ठेवत याचिका फेटाळली. याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर विजयाबाई सूर्यवंशी यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १५ डिसेंबरला सकाळी नऊ वाजेच्यापूर्वी ही घटना घडली. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.
विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिला होता पोलिस यंत्रणेला अर्ज मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर १८ डिसेंबरला वियजाबाई सूर्यवंशी यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयासह विविध यंत्रणेकडे अर्ज दिले होते. राज्यात हे प्रकरण गाजले. यात पोलिस यंत्रणेने मात्र या अर्जाला केराची टोपली दाखविली होती. यानंतर अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी याच अर्जान्वये हा गुन्हा नोंद केला आहे.
काय होता हायकोर्टाचा निकाल परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात ८ दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी परभणी येथील मोंढा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षकपदाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे निर्देश खंडपीठाने परभणीच्या एस. पीं.ना दिले आहेत. या कोठडीतील मृत्यू प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये तब्बल ७२ पोलिस कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे.