सहकाराच्या लढाईत सेनेची कमाई तर राष्ट्रवादीची हाराकिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:43+5:302021-04-12T04:15:43+5:30
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने एकतर्फी बाजी मारली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांची ...

सहकाराच्या लढाईत सेनेची कमाई तर राष्ट्रवादीची हाराकिरी
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने एकतर्फी बाजी मारली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपुडकर यांची अध्यक्षपदी तर हिंगोलीतील शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी मागील आठवड्यात बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता या निवडणुकीचा राजकीय पक्षाकडून लेखाजोखा घेतला जात आहे. निवडणुकीतील राजकीय डावपेच आणि सत्तेसाठी खेळलेल्या चाली लक्षात घेता शिवसेनेसाठी ही निवडणूक फायद्याची ठरली आहे. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी आतापर्यंत जिल्हा बँकेत मात्र सेनेची एंट्री झाली नव्हती. यावेळी खा. बंडू जाधव आणि परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत सहकार क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. पक्षाचे तीन संचालक निवडून आणले. शिवाय उपाध्यक्षपदही मिळविले. यासाठी काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या चाणक्यनीतीचा शिवसेनेला फायदा झाला. शिवाय काँग्रेसही प्लसमध्येच राहिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अधिक अपेक्षेतून हाराकिरी स्वीकारावी लागली. या निवडणुकीत पक्षाचे दोन गट पडले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरून बँकेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवत वरपुडकरांची साथ सोडून भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निवडणूक निकालात बोर्डीकरांच्या पॅनलला बहुमत मिळू शकले नाही. तरीही राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून आल्यामुळे त्यांना बँकेचे अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा होती. यातून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार यांनीही त्यांना हिरवी झेंडी दाखविली असल्याचे आ. दुर्राणी म्हणाले. त्यामुळे त्यांनी आपणास जो अध्यक्षपद देईल त्यालाच पाठिंबा देऊ, अशी घोषणा केली; परंतु, 'सियासत की अपनी अलग इक जबां है, लिखा हो जो इकरार इन्कार पढना है।' या प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांच्या ओळींचा आ. दुर्राणी यांना विसर पडला आणि ऐन मतदानाच्या दिवशीच सकाळी पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी परभणीत येऊन वरपुडकरांसोबत जाण्याचा दादांचा निरोप असल्याचे दुर्राणी यांना सांगितले. त्यामुळे आ. दुर्राणी नाराज होऊन निवडणूक प्रक्रियेसाठी न थांबता सरळ पाथरीला निघून गेले. त्यानंतर या निवडणुकीतील हवाच निघाली. परिणामी वरपुडकर व गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वाला प्रसिद्ध गीतकार व शायर जावेद अख्तर म्हणतात त्याप्रमाणे 'कभी जो ख्वाब था वो पाल लिया है, मगर जो खो गई वो चीज क्या थी।' याचा विचार करावा लागेल.