प्राण्यांच्या आजारावरील प्रयोगशाळेला मंजुरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST2021-01-13T04:43:05+5:302021-01-13T04:43:05+5:30

परभणी : परभणी येथे तत्काळ प्राण्यांच्या आजारांवरील प्रयोगशाळा (हायसिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज लॅब) उभारणीस मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. डॉ. ...

Approve a laboratory on animal diseases | प्राण्यांच्या आजारावरील प्रयोगशाळेला मंजुरी द्या

प्राण्यांच्या आजारावरील प्रयोगशाळेला मंजुरी द्या

परभणी : परभणी येथे तत्काळ प्राण्यांच्या आजारांवरील प्रयोगशाळा (हायसिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज लॅब) उभारणीस मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे. त्यामुळे हजारो कोंबड्या व इतर पक्षी मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रोगाच्या प्रतिबंध करण्यासाठी परभणी येथे हायसिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज लॅब उभारण्याची गरज आहे. याच अनुषंगाने १२ जानेवारी रोजी आ. डॉ. राहुल पाटील यांनी प्रादेशिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतली. या बैठकीस औरंगाबाद येथील प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त शिवाजी पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावने, सहायक पशुधन अधिकारी आर. बी. शितळे, नगरसेवक सुशील कांबळे आदींची उपस्थिती होती.

देशात सद्य:स्थितीत भोपाळ येथे बीएसएल ४ ही बायोसेक्युरिटी अस्तित्वात असून, संपूर्ण देशात उद्भवलेल्या पक्षी व प्राण्यांवरील आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी या प्रयोगशाळेची मदत घेतली जाते़ महाराष्ट्रात मात्र कुठेही अशा प्रकारची लॅब उपलब्ध नाही. परभणी येथे कृषी विद्यापीठ तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात बर्ड फ्लूसारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी परभणी येथे हायसिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसीज लॅब उभारण्याची गरज आहे. बर्ड फ्लू हा एच-५ एन-१ इपिडेमिक विषाणू असून, यापासून मानवाला कोणताही धोका नाही. त्यामुळे पोल्ट्री फार्म चालकांनी घाबरून जाऊ नये. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून भरीव मदत करण्यात येईल, असेही आ. डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Approve a laboratory on animal diseases