जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बुधवारी दुपारी दोन वाजता घेण्यात आली. ही सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती अजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. स्थायी समितीच्या सचिव म्हणून मंजूषा कापसे यांनी काम पाहिले. सभेस समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, सभापती शोभा घाडगे, मीराताई टेंगसे, अंजली आनेराव यांच्यासह सदस्य किशनराव भोसले, राम पाटील व सर्व अधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांविषयी चर्चा करण्यात आली. रेमडेसिविर इंजेक्शन ज्याप्रमाणे खरेदी केले, त्याच पद्धतीने लवकर म्युकरमायकोसिससाठी लागणारी औषधे जिल्हा परिषद सेस फंडातून खरेदी करावी, असे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी सांगितले. पोस्ट कोविड, म्युकरमायकोसिससाठी परभणी जिल्ह्यात टास्क फोर्सची तयारी करण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर लहान बालकांसाठी चारशे बेडचे रुग्णालय तयार करण्याच्या सूचना उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागात अंगणवाडीमार्फत म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती करावी, असेही आदेश देण्यात आले. यामध्ये बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध गावांच्या १३ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. ही कामे करण्यासाठी चार कोटी ६६ लाख ९ हजार ९८४ रुपये एवढा निधी खर्च केला जाणार आहे.
या रस्त्यांचा समावेश
बोरी-अंजनवाडी रस्त्याची सुधारणा, बोरी-करवली सिमेंट रस्ता तयार करणे, साखरतळा ते भोसी रस्त्याची सुधारणा करणे, कोरवाडीला जोडणारा रस्ता तयार करणे, कौडगाव रस्त्याची सुधारणा करणे, जोडरस्ता चांगेफळ ते आलेगाव रस्त्याची सुधारणा करणे, बाबुळगाव-सोन्ना रस्त्याची सुधारणा करणे, दुधगाव बोबडे-टाकळी, दुधगाव ते जिंतूर, राज्य महामार्ग २४८ ते चांदज रस्ताची सुधारणा करणे, बाबूलतार-चाटेपिंपळगाव, पाथरी -सारोळा-वझर-सारंगपूर रस्त्याची सुधारणा करणे, मसला खुर्द ते लोणी बुद्रुक रस्त्याची सुधारणा करणे, राज्य महामार्ग ६१ ते रेणाखळी रस्त्याची सुधारणा करणे व जोडरस्ता शिंदेटाकळीची सुधारणा करणे या कामांचा समावेश आहे.