दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले तरी मृत्युदर कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:47+5:302021-05-29T04:14:47+5:30
परभणी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली, असली तरी पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांचा सरासरी मृत्युदर कमीच ...

दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले तरी मृत्युदर कमीच
परभणी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली, असली तरी पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णांचा सरासरी मृत्युदर कमीच असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनामुळे देशभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरेानाचा कहर सद्य:स्थितीत काही अंशी कमी झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेची पडताळणी केली असता, दुसऱ्या लाटेपेक्षा पहिली लाटच अधिक गंभीर असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यांच्या कालावधीतील पहिल्या लाटेत एकूण ८४ हजार ६५२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ३२३ जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे हे प्रमाण ३.७१ टक्के आहे. तर, पॉझिटिव्हिटी रेट १०.२७ टक्के होता. जानेवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. जानेवारी २०२१ ते २७ मे २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत २ लाख २१ हजार २७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात ४२ हजार ७७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील ७७४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुगणांच्या तुलनेत सरासरी १.८० टक्के मृत्यूचे हे प्रमाण आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट १९.३५ टक्के असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यू
एप्रिल २०२१ हा महिना जिल्हावासीयांसाठी कर्दनकाळ ठरला. या महिन्यात तब्बल २३ हजार २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ४६९ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर चालू महिन्यात आतापर्यंत १२ हजार २ रुग्ण आढळले असून, १३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणीत मयतांचे प्रमाण अधिक
जिल्ह्यात २७ मेपर्यंत १ हजार ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५६२ मयत परभणी तालुक्यातील आहेत. त्यानंतर जिंतूरमध्ये ९९, गंगाखेडमध्ये ७३, पूर्णा ६५, मानवत ६३, सेलू ६१, पाथरी ५८,पालम ३१ आणि सोनपेठ तालुक्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे.