तेलबिया संशोधनासाठी हैदराबादच्या संस्थेशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:01+5:302021-03-26T04:18:01+5:30
परभणी : तेलबियांच्या संशोधनासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हैदराबाद येथील भारतीय तेल बिया संशोधन संस्थेसोबत सामंजस्य करार ...

तेलबिया संशोधनासाठी हैदराबादच्या संस्थेशी करार
परभणी : तेलबियांच्या संशोधनासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हैदराबाद येथील भारतीय तेल बिया संशोधन संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. २२ मार्च रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या उपस्थितीत हैदराबाद येथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारतीय तेल बिया संशोधन संस्था ही देशातील तेलबिया पीक संशोधनात अग्रगण्य संस्था असून, दोन संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन कार्यासाठी, तसेच पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी हा सामजंस्य करार महत्त्वाचा ठरणार आहे. या करारामुळे विद्यापीठांतर्गत कृषी जैव तंत्रज्ञान, तसेच कृषी विद्याशाखेतील विविध विद्यार्थ्यांना भारतीय तेल बिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील प्रयोगशाळेत संशोधन कार्य अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. यासोबत दोन्ही संस्थांमध्ये विविध तंत्रज्ञानाची देवाण- घेवाणही होणार आहे. भविष्यात दोन्ही संस्थांमधील एकत्रित संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील, तसेच तेलबियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती, तंत्रज्ञान, विविध महिला बचत गट व शेतकरी गटांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल.
हैदराबाद येथे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. एम. सुजाता व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी करारवर स्वाक्षरी केली आहे. यावेळी विद्यापीठातील लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम.के. घोडके, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, हैदराबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर बाबू, डॉ. रत्नकुमार आदी उपस्थित होते.