आंदोलन एका ठिकाणी तर वाहतुकीची कोंडी गावभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST2021-09-02T04:39:14+5:302021-09-02T04:39:14+5:30
परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी हजारो युवकांच्या उपस्थितीत आंदोलन ...

आंदोलन एका ठिकाणी तर वाहतुकीची कोंडी गावभर
परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी हजारो युवकांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक गावातून मोटरसायकलवर युवक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. जिंतूर रोड, वसमत रोड या मार्गाने येणाऱ्या युवकांच्या दुचाकी लावण्यासाठी शिवाजी महाविद्यालय परिसर व स्टेडियम परिसर येथे सोय करण्यात आली होती. यातच शहरात पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ते बंद केल्यामुळे बसस्थानक, रेल्वे स्टेशन ते वसमत रोड या मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. तसेच वसमत रोडकडून बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरूनच दोन्ही वाहतूक सुरू ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
नारायण चाळ, विसावा कॉर्नर भागात कोंडी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथून एकेरी मार्गाने वसमत रोड जाण्यासाठी दुहेरी वाहतूक सुरु ठेवली होती. या मार्गावर आंदोलन सुरू असल्याने अनेकांनी स्टेशन रोडकडे वाहने वळविली. यामुळे स्टेशन रोड, नारायान चाळ, विसावा कॉर्नर या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी पोलिसांना सर्वच चौकांमध्ये बॅरिकेट लावावे लागले व बंदोबस्त ठेवावा लागला.
महात्मा फुले पुतळा ते शिवाजी पुतळा रस्ता बंद
शहर वाहतूक शाखेने स्टेडियम जवळ महात्मा फुले पुतळा ते शिवाजी पुतळा हा रस्ता सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. केवळ स्टेडियम परिसरात पार्किंग करण्यासाठी आलेली वाहने या भागात सोडण्यात येत होती. यामुळे या भागात ये-जा करणाऱ्या अनेकांना अडथळा निर्माण झाला.