पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST2021-05-14T04:17:16+5:302021-05-14T04:17:16+5:30
लग्न सोहळ्याच्या माध्यमातून मंगल कार्यालय, केटरिंग, बँड पथक यासह इतर अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभे राहतात. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून ...

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन
लग्न सोहळ्याच्या माध्यमातून मंगल कार्यालय, केटरिंग, बँड पथक यासह इतर अनेक छोटे-मोठे व्यवसाय उभे राहतात. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून हे व्यवसाय ठप्प आहेत. यावर्षीदेखील लग्न सोहळ्यांवर लॉकडाऊनची संक्रांत असल्याने परभणी शहरात सुमारे दीड कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. मे महिन्यात १० ते १२ लग्नतिथी असतानाही शासनाच्या नियमांमुळे एकही लग्नसोहळा मंगल कार्यालयात पार पडला नाही. परिणामी मंगल कार्यालय चालकांसह इतर अनेक छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संचारबंदीच्या नियमांचा फटका वधू आणि वर पक्षासह मंगल कार्यालय चालक व इतर व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
नियमांचा अडसर कायम
२५ वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांना राज्यभरात परवानगी दिली जात असली तरी परभणी जिल्ह्यात मात्र लग्नसोहळ्यासाठी केवळ दहा ते पंधरा वऱ्हाडी मंडळींची परवानगी दिली जात आहे. या नियमांमुळे लग्नसोहळे करताना अडचण निर्माण होत असून, अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत.
मंगल कार्यालय व्यावसायिक आर्थिक कोंडीत
लग्नसोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींना नियमांचे बंधन घातले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयात येऊन लग्न सोहळा पार पाडणे आर्थिकदृष्ट्या नागरिकांना शक्य होत नाही. परिणामी मंगल कार्यालयातील लग्न सोहळे ठप्प आहेत.
एका लग्न सोहळ्यात मंगल कार्यालय चालकाकडून सरासरी दोन लाख रुपयांची उलाढाल होते. त्याचप्रमाणे केटरिंग, बँड पथक, फोटोग्राफर, कापड, भाजी विक्रेते, मंडप सजावट या छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून एक दीड लाख रुपयांची उलाढाल होते.
मात्र, प्रशासनाच्या नियमांमुळे मंगल कार्यालयात लग्न सोहळे होत नसल्याने कार्यालय चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मे महिन्यात सुमारे दहा ते पंधरा लग्नसोहळ्यांचा उलाढालीवर पाणी फेरावे लागले आहे.
मे महिन्यातील मुहूर्त
मे महिन्यात दहा लग्न मुहूर्त आहेत. त्यात १३, २०,२१, २२, २८, ३० आणि ३१ मे रोजी विवाह मुहूर्त आहेत.