परभणी जिल्ह्यात कालव्यांच्या दुरुस्तीला प्रशासनाने दिला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:08 IST2017-11-27T00:07:10+5:302017-11-27T00:08:14+5:30
जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़

परभणी जिल्ह्यात कालव्यांच्या दुरुस्तीला प्रशासनाने दिला फाटा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यातून गेला आहे़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात या कालव्याच्या सहाय्याने शेतीचे सिंचन केले जाते़ कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे़ अनेक ठिकाणी फरशी उखडली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ तसेच झुडपेही वाढले आहेत़ या कालव्यात अनेक ठिकाणी उपवितरिका असून, या वितरिकांमध्ये मागील काही वर्षांपासून पाणी वाहिले नसल्याने त्या बुजून गेल्या आहेत़ परिणामी कालव्यातून सोडलेले पाणी वितरिकांमधून टेलपर्यंत पोहचत नाही आणि सिंचनात अडथळे निर्माण होतात़ यावर्षी जायकवाडी प्रकल्पात पाणी उपलब्ध असल्याने हे पाणी परभणी जिल्ह्यासाठी मिळणार हे नक्की होते़ त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी वितरिकांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते़ मात्र पाटबंधारे विभागाने या दुरुस्तीलाच फाटा दिला आहे़ रबी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले जात असून, दुरुस्ती केली नसल्याने हे पाणी शेतकºयांना मुबलक प्रमाणात उपलब्ध मिळण्याबद्दल शंका निर्माण झाली आहे़
विशेष म्हणजे, जायकवाडी प्रकल्पातून यावर्षी आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे़ परंतु, कालवेच खराब असतील तर जायकवाडीचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहचेल कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे़