खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:51+5:302021-06-04T04:14:51+5:30
आरोपी आनंद खंदारे याने १७ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नाचे आमिष दाखवून मयुरी हिला पळवून नेले होते. दोघेही शहरातील हाडको ...

खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
आरोपी आनंद खंदारे याने १७ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नाचे आमिष दाखवून मयुरी हिला पळवून नेले होते. दोघेही शहरातील हाडको परिसरात राहत होते. १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मयुरी आणि आरोपी आनंद खंदारे यांच्यात वाद झाला. या वादातूनच सकाळच्या सुमारास आनंद खंदारे याने मयुरीचा खून केला, अशी तक्रार नानलपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासमोर चालले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. घटनास्थळावरून जप्त केलेले पुरावे, शवविच्छेदन अहवाल, गळ्याला झटका दिल्याने मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जवाब तसेच आरोपींची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोपीच्या शरीरावर मानवी नखाच्या प्रतिकार केल्याच्या खुणा असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी आरोपी आनंद नाथा खंदारे यास कलम ३०२ भादवि अन्वये जन्मठेप व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात ॲड. ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अंमलदार डी. के. खुणे, कर्मचारी सूर्यवंशी, टाक यांनी काम पाहिले.