फरार आरोपीस परभणी पोलिसांच्या पथकाने घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST2021-02-09T04:20:05+5:302021-02-09T04:20:05+5:30
कातनेश्वर येथे घडलेल्या गुन्ह्यात येथील एकनाथ बाबुराव गिराम (वय ३०) हा आरोपी पोलिसांना हवा होता. त्यास ताब्यात ...

फरार आरोपीस परभणी पोलिसांच्या पथकाने घेतले ताब्यात
कातनेश्वर येथे घडलेल्या गुन्ह्यात येथील एकनाथ बाबुराव गिराम (वय ३०) हा आरोपी पोलिसांना हवा होता. त्यास ताब्यात घेण्यासाठी परभणी पोलिसांचे पथक पोउपनि चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहुल चिंचाने, शंकर गायकवाड, जमीर फरुकी, अजहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदिराज, चालक अरूण कांबळे हे पूर्णा परिसरात गस्तीवर होते. कातनेश्वर परिसरात शोध सुरू असताना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. या माहितीवरून आरोपी हा आहेरवाडी ते सुहागण रस्त्यावरून सुहागणकडे पायी जात आहे. अशी खात्रीलायक माहिती असल्याने रविवारी सायंकाळी रस्त्यालगतच्या भागात सापळा रचला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यास ताब्यात घेऊन पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याकामी गावातील नागरिकांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले.
आरोपीस पकडण्यासाठी ३६ तासाची मेहनत
कातनेश्वर येथील आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्यास ताब्यात घेण्यासाठी परभणी पोलिसांनी शनिवारपासून प्रयत्न सुरू केले होते. ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर व गावकऱ्यांच्या सहकार्याने तो आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली.