परभणीतून एकाचे अपहरण; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:40+5:302021-09-11T04:19:40+5:30
परभणी : शहरातील बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्याच्या परिसरातून एकाचे अपहरण केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी ८ ...

परभणीतून एकाचे अपहरण; तिघांवर गुन्हा
परभणी : शहरातील बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्याच्या परिसरातून एकाचे अपहरण केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी नवा मोंढा पेालीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील पांढरगाव येथील विठ्ठल सूर्यभान राठोड हे पुणे येथे राहतात. ५ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी गवळणबाई राठोड यांचे वडील परभणी येथील लाइफलाइन दवाखाना येथे उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्याने विठ्ठल राठोड हे कुटुंबीयांसह परभणीत आले. सकाळी त्यांनी दवाखान्यात जावून सासऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर गावाकडे जावून दुसऱ्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास पुणे येथे जायचे असल्याने ते शहरात आले. यावेळी या दवाखान्यात पुन्हा ते सासऱ्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्या ओळखीतील विठ्ठल सीताराम राठोड, लिंबाजी सीताराम राठोड व पुतण्या संतोष रामराव राठोड हे तिघे तेथे आले. यावेळी त्यांनी विठ्ठल राठोड यांना चहा घेण्यासाठी चला म्हणून बाहेर नेले. बराच वेळ झाला तरी ते दवाखान्यात परत आले नाहीत. ट्रॅव्हल्सने जाण्याची वेळ झाली, तरी ते येत नसल्याने त्यांना फोन केला. त्यांचा नंबर बंद येत होता. त्यामुळे दवाखान्याच्या बाहेर येऊन विठ्ठल राठोड यांच्या पत्नी गवळणबाई राठोड यांनी पाहिले असता, दवाखान्याच्या समोरील एका हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तिघे जण विठ्ठल राठोड यांना उचलून घेऊन जाताना दिसून आले. पुतण्या संतोष राठोड सोबत असल्याने काही तरी काम असेल म्हणून गवळणबाई यांनी फारशी चौकशी केली नाही; परंतु त्यानंतरही पती विठ्ठल राठोड हे आले नाहीत. त्यामुळे त्यांनी ९ सप्टेंबर रोजी नवा मोंढा पेालीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विठ्ठल सीताराम राठोड, लिंबाजी सीताराम राठोड व संतोष रामराव राठोड या तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.