पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला ९५ व्हेंटिलेटर्स; यातील १४ बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:33+5:302021-05-13T04:17:33+5:30
परभणी : केंद्र शासनामार्फत पीएम केअर फंडमधून जिल्ह्याला आत्तापर्यंत ९५ व्हेंटिलेटर्स मिळाले असून त्यातील १४ व्हेंटिलेटर्स तांत्रिक कारणांमुळे ...

पीएम केअर फंडामधून जिल्ह्याला ९५ व्हेंटिलेटर्स; यातील १४ बंदच !
परभणी : केंद्र शासनामार्फत पीएम केअर फंडमधून जिल्ह्याला आत्तापर्यंत ९५ व्हेंटिलेटर्स मिळाले असून त्यातील १४ व्हेंटिलेटर्स तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. गंभीर बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेकवेळा व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असते. रुग्णांची ही गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या वतीने देशातील सर्व राज्यांना पीएम केअर फंडमधून व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. राज्यालाही या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये परभणी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ८० तर दुसऱ्या टप्प्यात १५ व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत. हे व्हेंटिलेटर्स जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद कोविड रुग्णालय, आयटीआय कोविड रुग्णालय, गंगाखेड, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आले आहेत. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पीएम केअर मधून व्हेंटिलेटर्स देण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी ते चालू करण्यात आलेले नाहीत. यासाठी प्रशासनाकडून तांत्रिक कारण देण्यात येत आहे. असे असले तरी त्यामुळे ज्या उद्देशाने हे व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत, तो उद्देश सफल होताना दिसत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून बंद असलेले व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करावे लागणार आहेत.
२ व्हेंटिलेटर्स बंदच आले
जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद येथून १५ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्यातील २ व्हेंटिलेटर्स बंद होते. त्यामुळे ते वापरात आले नाहीत. सघ्यस्थितीत हे व्हेंटिलेटर्स संबंधित कंपनीचे कर्मचारी दुरुस्त करण्यासाठी आले नाहीत, म्हणून बाजूला ठेवण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालय
पीएम केअरमधून जिल्हा सामान्य रुग्णालयास २० व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. हे सर्व व्हेंटिलेटर्स सुरू असल्याची माहिती या कार्यालयातून देण्यात आली.
जिल्हा परिषद रुग्णालय
परभणीतील जिल्हा परिषद रुग्णालयास ३८ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडमधून देण्यात आले होते. हे सर्व व्हेंटिलेटर्स सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
सेलू उपजिल्हा रुग्णालय
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयास ४ व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते; परंतु तांत्रिक कारणांमुळे येथील चारही व्हेंटिलेटर्स सद्यस्थितीत बंद आढळून आले आहेत.