९३ लाख टन उसाचे होणार गाळप
By Admin | Updated: November 5, 2014 13:29 IST2014-11-05T13:29:50+5:302014-11-05T13:29:50+5:30
नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत.

९३ लाख टन उसाचे होणार गाळप
रामेश्वर काकडे /नांदेड
नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत. एकूण कारखान्याकडून ९३ लाख १८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.
नांदेड येथील प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयातंर्गत नांदेडसह, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ५८ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आलेली आहे. यात लातूर जिल्ह्यात ४६३९७ हेक्टर, परभणी ३२ हजार हेक्टर, नांदेड २३५२९ हेक्टर, उस्मानाबाद ३९८१६ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यात १७१४६ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.
गतवर्षी नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी ८२ लाख७८ हजार टन उसाचे गाळप केले होते. तर यंदा ९३ लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. यावर्षासाठी केंद्र शासनाने योग्य किफायतशीर भाव ऊसाच्या ९.५ टक्के उतार्यासाठी प्रतिटन २२00 रुपये तर यानंतर उतार्यात एक टक्का वाढल्यास प्रतिटक्का २३२ रुपये दर मिळणार आहे. तर गतवर्षी हेच दर साडेनऊ टक्क्यांसाठी २१00 रुपये व त्यानंतर २२१ रुपये प्रतिटक्का याप्रमाणे होते.
विभागातील एकूण ३४ कारखान्यांपैकी १८ खाजगी तर १५ सहकारी कारखाने आहेत. यात परभणी ६, हिंगोली ३, नांदेड ५, उस्मानाबाद १0 तर लातूर जिल्ह्यात १0 कारखाने आहेत.साखर सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या एकूण ३४ प्रस्तावांपैकी सहा कारखाने यावर्षीच ऊस गाळप करणार आहेत. तर उर्वरित २८ कारखान्यानी गतवर्षीही उसाचे गाळप केले होते.