बाधितांच्या संपर्कातील ९ हजार नागरिक सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:37+5:302021-05-13T04:17:37+5:30
परभणी : जिल्ह्यात नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ९ हजार २५४ नागरिक तपासणीसाठी सापडत नसल्याने या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा ...

बाधितांच्या संपर्कातील ९ हजार नागरिक सापडेनात
परभणी : जिल्ह्यात नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ९ हजार २५४ नागरिक तपासणीसाठी सापडत नसल्याने या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या किमान २० नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने दिले आहे. बाधित रुग्णाच्या अतिजवळचे नातेवाईक आणि संपर्कातील नागरिक यांची कोरोना तपासणी केली जाते. बाधित कोरोना रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षक, तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात ४३ हजार ४६६ बाधित रुग्ण नोंद झाले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३४ हजार २१२ नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाने केली आहे. मात्र, ९ हजार २५४ नागरिकांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे या नागरिकांना शोधून त्यांची कोरोना तपासणी करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
ग्रामीण भागात ६ हजार ९०० नागरिकांचा शोध
सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक पसरला आहे. ग्रामीण भागातील १७ हजार ८६३ नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली आहे. ६ हजार ९१७ नागरिकांचा शोध घेण्याचे काम अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या नागरिकांना शोधून त्यांची कोरोना तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
परभणी तालुक्यात साडेपाच हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शिल्लक
परभणी तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ४४७ नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे शिल्लक आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील ३ हजार ३९९ आणि शहरी भागातील २ हजार ४८ नागरिकांचा शोध घेणे शिल्लक आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील २५२, मानवत ३१४, पूर्णा २७७, पालम ५९, जिंतूर २३८, सेलू १ हजार ७८३, परभणी २७३ आणि सोनपेठ तालुक्यात ३२२ नागरिकांचा शोध घेणे शिल्लक आहे.