परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत २२ फेब्रुवारीपर्यंत १८४ जणांचे अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांची मंगळवारी छानणी झाली. त्यानंतर काही अर्जांवर आक्षेप दाखल झाले. या आक्षेपांवर रात्री उशिरापर्यंत सुनावणी चालली. त्यानंतर १६ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, राष्ट्रवादीचे प्रल्हाद मुरकुटे, रुक्मिणबाई ज्ञानोबाराव सानप, संजय राठोड (दोन गटातून), बाबाराव राखोंडे, बालाजी कावळे, सत्यभामा देवदास देसाई (दोन गटांतून), त्रिंबकेश्वर बालासाहेब मुळे, भगवान नारायणराव वाघमारे, मीनाताई दिनेश देशमुख (दोन गटातून), व्यंकट राखे व रेणुकाबाई पांडुरंग राठोड यांचा समावेश आहे. शिवाय काही उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांचा एक अर्ज वैद्य ठरल्याने तोच अर्ज ग्राह्य धरण्यात आला. त्यामुळे आता एकूण ८४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. १० मार्च हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिनांक आहे. त्यावेळी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
चार ठिकाणी सरळ लढतीची शक्यता
प्राथमिक कृषी पतपुरवठा व धान्य अधिकोष गटात पाथरीचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या विरोधात दत्ता नारायण गोंधळकर यांचा अर्ज आहे. येथे समशेर वरपूडकर यांचाही अर्ज आहे; परंतु तो मागे घेतला जाऊ शकतो. तर सेलू येथील गटात आ. मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य राजेंद्र लहाणे यांचा अर्ज आहे. गंगाखेड गटात जि. प. सदस्य भगवानराव सानप यांच्या विरोधात सुभाष ठवरे यांचा अर्ज आहे. येथे यशश्री भगवान सानप यांचाही अर्ज आहे; परंतु तो मागे घेतला जाऊ शकतो. मानवत गटात बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट यांच्या विरोधात माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे बंधू गंगाधर कदम-बोर्डीकर यांचा अर्ज आहे. येथे आकाश पंडितराव चोखट यांचाही अर्ज आहे; परंतु तो मागे घेतला जाऊ शकतो. सोनपेठ गटातही गंगाधर कदम-बोर्डीकर यांचा माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या विरोधात अर्ज आहे. येथे श्रीकांत भोसले यांचाही अर्ज आहे; परंतु तो मागे घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या चारही ठिकाणी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. इतर गटात मात्र दोन पेक्षा अधिक अर्ज असल्याने तेथील लढतीचे चित्र १० मार्च नंतर स्पष्ट होणार आहे.