८० लाखांच्या निधी वाटपाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:03+5:302021-08-23T04:21:03+5:30

कृषी व्यवसायाला उद्योजकतेची जोड देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्याला निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत ...

80 lakh fund allocation break | ८० लाखांच्या निधी वाटपाला ब्रेक

८० लाखांच्या निधी वाटपाला ब्रेक

कृषी व्यवसायाला उद्योजकतेची जोड देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्याला निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत येथील आत्मा प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये २ कोटी १० लाख ६० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून महिला बचतगट, शेतकरी बचतगटांना कृषीवर आधारित उद्योग उभा करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

आत्माने या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकरी बचतगटांना १ कोटी ६२ लाख रुपये आणि महिला बचतगटांना ८८ लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. मागील आर्थिक वर्ष संपले असून, आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले, तरीही आत्माला प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी ८० लाख रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित आहे. या निधीसाठी अनेक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत; परंतु निधी वाटप करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, निधी उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांना वेळेत वितरित होत नाही. त्याचप्रमाणे पूर्वीचा निधी खर्च झालेला नसल्याने नवीन निधी उपलब्ध होत नाही. प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना केवळ कागदावरच राहत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने शिल्लक निधीचे त्वरित वितरण करावे आणि नवीन निधीसाठी नोंदणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

५३८ बचतगटांना लाभ

आत्मा योजना अंतर्गत २०१९-२० मध्ये प्राप्त झालेल्या निधीपैकी जिल्ह्यातील ५०१ महिला बचतगटांना ८८ लाख ६० हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. सोयाबीन क्लस्टरसाठी हा निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे ३७ बचतगटांना कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने १ कोटी ६२ लाख रुपयांचे वितरण झाले आहे. त्यात दालमिलसाठी ९, हळद प्रक्रिया उद्योगासाठी दोन, प्राथमिक हळद प्रक्रिया उद्योगासाठी ४ तर तेल घाण्यासाठी ८ बचतगटांना निधी प्राप्त झाला आहे.

बदलीनंतरही उपसंचालक परभणीतच

येथील आत्माचे प्रकल्प उपसंचालक खंडेराव सराफ यांची बदली ९ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर झाली आहे. बदलीच्या आदेशातच येथील प्रकल्प उपसंचालक पदाचा पदभार समकक्ष अधिकाऱ्याकडे सोपवून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे असताना बदलीचे आदेश निघून १३ दिवसांचा कालावधी उलटला तरीही सराफ हे परभणी येथेच आहेत. बदली रद्द करण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याने अद्याप ते परभणी येथून कार्यमुक्त झाले नसल्याची माहिती मिळाली.

Web Title: 80 lakh fund allocation break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.