परभणी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण; शौचालय बांधकामाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:37 PM2018-09-28T13:37:31+5:302018-09-28T13:39:24+5:30

प्रशासकीय अडथळ्यांबरोबरच वाळू समस्येमुळे शौचालय बांधकामाची गती मंद होत चालली आहे़

75 percent of Swachh Bharat Mission has completed in Parbhani district; Toilets construction slow down | परभणी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण; शौचालय बांधकामाची गती मंदावली

परभणी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण; शौचालय बांधकामाची गती मंदावली

Next

- प्रसाद आर्वीकर 

परभणी : महाराष्ट्र शासनाने नागरी भागात यावर्षी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये १५ हजार १३६ वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्रशासकीय अडथळ्यांबरोबरच वाळू समस्येमुळे शौचालय बांधकामाची गती मंद होत चालली आहे़ आतापर्यंत ७५ टक्के शौचालये बांधून पूर्ण झाले असून, उर्वरित कामे करण्यासाठी लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून प्रशासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ सुरुवातीला ग्रामीण  भागात हे  अभियान सुरू करण्यात आले़ खेडी हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने वैयक्तीक शौचालय बांधकामांना सुरुवात केली़ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामसाठी अनुदानही देऊ केले़ ग्रामीण भागामध्ये या अभियानास प्रतिसाद मिळत असतानाच शहरी भागातही ग्रामीण भागापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याची बाब समोर आली़ अनेक शहरांमध्ये सार्वजनिक हागणदारी स्थळे असल्याचे दिसत होते़ त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला़ या निर्णयानुसार नागरी भागासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले़ या अभियानात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला. 

परभणी जिल्ह्यामध्ये आठही नगरपालिकांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले़ त्यात नगरपालिकास्तरावर २० हजार ३७४ लाभार्थ्यांकडे शौचालय नसल्याने या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट नगरपालिकांना ठरवून दिले़ या उद्दिष्टानुसार नागरी भागात अभियानाला सुरुवात करण्यात आली़ हे अभियान जवळपास पूर्णत्वाला गेले आहे; परंतु, अजूनही वैयक्तीक शौचालयांची केवळ ७५ टक्के कामे झाली आहेत़ शौचालय बांधकामासाठी नगरपालिकेमार्फत लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते; परंतु, प्रत्यक्षात अनुदान कमी असून, शौचालय बांधकामासाठी अधिक रक्कम लागत आहे़ प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासिनता या प्रकारामुळे वैयक्तीक शौचालय बांधकामाला गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे प्रत्यक्षात स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी उद्दिष्टाच्या पुढे जाऊन शौचालय बांधकामे करीत शौचालयांचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक झाले आहे़ स्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छतागृह उभारण्याचा हा पहिला टप्पा असून, या पुढील काळातही वेगवेगळ्या टप्प्यावर कामे होणार असल्याची माहिती मिळाली़. 

सार्वजनिक शौचालयांचे १०० टक्के काम
स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक शौचालय उभारणीचे काम गतीने झाले आहे़ अभियान काळामध्ये सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी भरीव तरतूद करण्यात आली़ त्यातून शहरी भागामध्ये ६२ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत़ त्यात मानवत शहरात ८, सेलू, जिंतूर, पालम शहरात प्रत्येकी ५, पाथरी, पूर्णा प्रत्येकी ९, गंगाखेड १३ आणि सोनपेठ शहरामध्ये ८ सार्वजनिक शौचालये बांधली आहेत़ त्यामुळे प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ शहरा-शहरात हागणदारीची स्थळे निष्काशीत करून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली़ या शौचालयांचा नियमित वापर झाला तर खऱ्या अर्थाने स्वच्छ शहर संकल्पना सार्थकी लागेल़. 

पाच सामूहिक शौचालये
शहरी भागामध्ये पाच सामूहिक शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे़ त्यात मानवत येथे ४ आणि पूर्णा येथे १ सामूहिक शौचालय उभारून स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे़ जिल्ह्यात मागील एक वर्षापासून वाळुची टंचाई निर्माण झाली आहे़ ही टंचाई कृत्रिम स्वरुपाची असल्याने वाळुचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ २० हजार ते २२ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू मिळत आहे़ वाळुच्या किंमती गगनाला भिडल्याने बांधकामाचा खर्च वाढत आहे़ शासन देत असलेल्या अनुदानात अर्धी रक्कम वाळू खरेदी करण्यातच जात आहे़ वाढलेली महागाई आणि वाळूचे भाव गगनाला भिडल्याने शौचालय बांधकामाला गती मिळत नाही़. त्यामुळे शौचालय बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने माफक दरात वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे़ 

जिंतूर शहर आघाडीवर
स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक शहरात वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते़ या कामात जिंतूर शहराने आघाडी घेतली आहे़ शहरातील १ हजार ९०९ लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते़ आतापर्यंत १ हजार ६७५  (८७़७४ टक्के) वैयक्तीक शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे़ 
४सोनपेठ शहरामध्ये १ हजार ८८२ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते़ आतापर्यंत १ हजार ६१० (८५़५४ टक्के) शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ त्याच प्रमाणे पाथरी शहरात २ हजार ६३७ पैकी २ हजार १८४ (८२़८२ टक्के), पालम शहरात १ हजार ५७३ पैकी १ हजार २२० (७७़५५ टक्के)़
गंगाखेड ३ हजार ७५ पैकी २ हजार २७३ (७३़९२ टक्के), सेलू शहरात ३ हजार ३४० पैकी २ हजार ३७८ (७०़३३ टक्के), मानवत शहरात ३ हजार १०८ पैकी २ हजार १०४ (६७़६९ टक्के) आणि पूर्णा शहरामध्ये २ हजार ८५० वैयक्तीक शौचालयांपैकी १ हजार ६९२ (५९़३६ टक्के) शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ 

पालिकास्तरावर पाठपुराव्याची गरज
नगरपालिकास्तरावर अनेक ठिकाणी उद्दिष्टांच्या तुलनेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे़ मात्र उर्वरित कामाला गती मिळत नसल्याची स्थिती आहे़ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन शौचालयांचे रखडलेले काम पूर्ण करून घेण्यासाठी पालिकास्तरावरून पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे़ तसेच शौचालयाच्या  वापरासंदर्भात अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे़.

Web Title: 75 percent of Swachh Bharat Mission has completed in Parbhani district; Toilets construction slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.