मुलांसाठी ५० खाटांचे आयसीयू उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:42+5:302021-05-16T04:16:42+5:30
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलांसाठी ५० खाटांचा स्वतंत्र आयसीयू कक्ष उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून, लवकरच ...

मुलांसाठी ५० खाटांचे आयसीयू उभारणार
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलांसाठी ५० खाटांचा स्वतंत्र आयसीयू कक्ष उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून, लवकरच हा कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, या लाटेत मुलांवर अधिक परिणाम होईल, अशी शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर काय उपाययोजना करावी लागेल, या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने मुलांसाठी ५० खाटांचा आयसीयू कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम येत्या एक-दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मोठ्या व्यक्तींची उपचार पद्धती आणि लहान मुलांच्या उपचार पद्धतीत मोठा फरक आहे. त्यामुळे लहान मुलांवर उपचार करण्यासाठी लागणार्या वैद्यकीय साहित्यांची खरेदी करून हे साहित्य तयार ठेवण्याचेही नियोजन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात चौथ्या मजल्यावर स्वतंत्र ४०० खाटांचे मुलांसाठीचा कक्ष सुरू करण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, या काळात लागणारे मनुष्यबळ, करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्यासह जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते.
आयव्ही इंजेक्शन उपलब्ध करणार
लहान मुलांना द्यावयाच्या आयव्ही स्वतंत्र पद्धतीच्या असून ऐनवेळी या आयव्हीचा तुटवडा भासू नये, या दृष्टीनेही प्रशासन तयारी करीत आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या इंजेक्शनचा साठा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या इंजेक्शनची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात येणार आहे.
औषधी साधनांसाठी नेमली समिती
कोरोना काळात मुलांना उपचारासाठी कोणती औषधी लागू शकते? त्याचप्रमाणे कोणत्या वैद्यकीय साधनांची आवश्यकता भासेल? याची एकत्रित माहिती तयार करण्याचे काम करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर मुलांसाठी लागणारी औषधी आणि इतर वैद्यकीय साधनांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात येणार आहे.
अँटीबॉडीज टेस्टिंग लॅबची उभारणी
संभाव्य कोरोना लाटेत उपचारादरम्यान अँटीबॉडीज टेस्टिंग लॅबची आवश्यकता भासेल, अशी शक्यता बालरोग तज्ज्ञांनी बैठकीत वर्तवली. त्यामुळे लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटीबॉडीज टेस्टिंग लॅब उभारण्याच्या संदर्भाने उपाययोजना केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.