ऑक्सिजनच्या ४९३ खाटा जिल्ह्यातील रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST2021-05-21T04:18:51+5:302021-05-21T04:18:51+5:30
दोन आठवड्यांपासून रुग्णांची संख्या घटली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रिक्त खाटांची संख्याही ...

ऑक्सिजनच्या ४९३ खाटा जिल्ह्यातील रिक्त
दोन आठवड्यांपासून रुग्णांची संख्या घटली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रिक्त खाटांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने कोविड रुग्णालयासह कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना केअर सेंटरची उभारणी केली. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ५१८ खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यापैकी १९९ खाटांवर ऑक्सिजन लागणारे रुग्ण उपचार घेत आहेत. तर व्हेंटिलेटरच्या ४४ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागात २७५ खाटा सध्या रिक्त आहेत. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभाग वगळून ४०७ खाटांवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात १८९ खाटांवर सध्या रुग्ण उपचार घेत असून, २१८ खाटा रिक्त आहेत. जिल्ह्यातील ४९३ ऑक्सिजन खाटा सध्या रिक्त असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जनरल खाटा ही मोठ्या प्रमाणात रिक्त
परभणी शहरासह सेलू, गंगाखेड आणि तालुक्याच्या ठिकाणी कोरोना केअर सेंटर्स उभारून कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर या केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. या केंद्रांमध्येही आता मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त होत आहेत. जिल्ह्यात ३ हजार ९११ खाटांची सुविधा प्रशासनाने केली होती. त्यापैकी सध्या १ हजार १२५ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. २ हजार ७८६ खाटा रिक्त आहेत. कोरोना रुग्णालयांमध्ये ८८७ खाटा रिक्त असून, ठिकठिकाणी निर्माण केलेल्या कोरोना सेंटर्समध्ये १ हजार ८९९ खाटा रिक्त आहेत.