एनएमएमएस परीक्षेत ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST2021-07-29T04:18:46+5:302021-07-29T04:18:46+5:30
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात ...

एनएमएमएस परीक्षेत ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात जिल्ह्यातील जि. प. शाळेतील ३९३ विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
राज्य शासनाच्या ''शाळा बंद शिक्षण सुरु'' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील अध्यापन व अध्ययन प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली. वर्षभरापासून सुरू केलेल्या अभ्यास गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी ग्रामीण भागात प्रभावीपणे शिक्षण प्रक्रिया राबवली. या शाळांमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य व कष्टकरी मुलांमध्ये शैक्षणिक जाणीवा निर्माण करण्याबरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रमही प्रभावीपणे राबविण्यात आले. याच शैक्षणिक उपक्रमांचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रवेशित करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला होता.
मंगळवारी एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३९३ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परभणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, तालुक्यातील १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याप्रमाणे मानवत तालुक्यातील १११, पाथरी ८६, सेलू २६, पूर्णा ११, गंगाखेड व पालम प्रत्येकी ८ आणि जिंतूर तालुक्यातील ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, शिक्षण सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आनेराव यांनी शिक्षण विभागाचे आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांनी अभ्यास गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे अध्ययन कार्य केले. त्याला विद्यार्थी व पालकांनी केलेल्या सहकार्यामुळेच सर्वांच्या कष्टाचे चीज झाले. या निकालाने जि. प. शाळामधील शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
सुचिता पाटेकर, शिक्षण अधिकारी (प्रा)