१८ हजार कृषीपंप धारकांकडे २९३ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:22+5:302021-02-14T04:16:22+5:30
जिंतूर तालुक्यात १८ हजार ७८ कृषीपंप धारकांनी महावितरणची वीज बिलाची थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून भरलेली नाही. त्यामुळे महावितरणच्यावतीने ...

१८ हजार कृषीपंप धारकांकडे २९३ कोटींची थकबाकी
जिंतूर तालुक्यात १८ हजार ७८ कृषीपंप धारकांनी महावितरणची वीज बिलाची थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून भरलेली नाही. त्यामुळे महावितरणच्यावतीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम धूनमधून राबविण्यात येत असते. परिणामी कृषीपंप धारकांना पिकांना पाणी देता येत नाही. या कृषीपंपधारकांकडे तब्बल २९३ कोटी रुपये महावितरणचे थकल्याने ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज बिल सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षात सहभाग घेतल्यास कृषी वीज बिलात ५० टक्के तर दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि चालू वर्षात सहभाग घेतल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे. ५ वर्षांपूर्वीची थकबाकी १०० टक्के व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींनी वसुली केल्यास मिळणार रक्कम
थकबाकी वसुलीसाठी मदत करणाऱ्या ग्रामपंचायतींना वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रती वीज बिल वसुलीसाठी ५ रुपये महावितरणकडून दिले जाणार आहेत. तसेच संपूर्ण थकबाकी वसूल केल्यास थकबाकीच्या ३० टक्के रक्कम आणि चालू वीज बिल वसूल केल्यास वसुलीच्या २० टक्के रक्कमही ग्रामपंचायतीला महावितरणकडून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली. या योजनेचा लाभ थकबाकीधारक आणि ग्रामपंचायतीने घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.