परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री दिवाकर रावते यांनी शहर स्वच्छतेसाठी परभणी मनपाला २५ लाख रुपये सुपूर्द केले. उत्तम आरोग्य सुविधा, पर्यावरण हे दैनंदिन जीवनाशी निगडित असून, या बाबींचा स्तर उत्तम असावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने आठ दिवस शहर स्वच्छतेचा उपक्रम राबविला जाणार आहे. यात प्रत्येक वार्डातील नाल्यांची सफाई, कचरा व्यवस्थापन, प्रत्येक प्रार्थनास्थळांच्या परिसरातील स्वच्छता केली जाणार आहे. या उपक्रमासाठी आ. डॉ. राहुल पाटील हे पुढाकार घेत आहेत. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना प्रत्येक नगर व वार्डातील स्वच्छतेसाठी मार्गदर्शन केले आहे. प्लास्टिक मुक्त शहर तसेच स्वच्छ शहर, सुंदर शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले. शिवाजी चौकातून या स्वच्छता मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी आ. डॉ. राहुल पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हाप्रमुख गंगाप्रमुख आणेराव, ज्ञानेश्वर पवार, अतुल सरोदे, रामप्रसाद रणेर, अनिल डहाळे, सुशील कांबळे, देवेंद्र देशमुख, सचिन पाटील, महेश चौधरी, नवनीत पाचपोर, उद्धव मोहिते, बबलू नागरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. /(प्रतिनिधी) |