२४ टक्के रुग्णांचा ४ ते ७ दिवसांमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:35+5:302021-05-16T04:16:35+5:30
परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या २१९ रुग्णांचा ४ ते ७ दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला असून, हे प्रमाण ...

२४ टक्के रुग्णांचा ४ ते ७ दिवसांमध्ये मृत्यू
परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या २१९ रुग्णांचा ४ ते ७ दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला असून, हे प्रमाण एकूण मृत्यूच्या २४.५२ टक्के एवढे आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १३ मेपर्यंत जिल्ह्यातील ८९३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूच्या कालावधीचा विचार करता सर्वाधिक २१९ रुग्णांचा मृत्यू हा त्यांना कोरोना झाल्यानंतर ४ ते ७ दिवसांच्या दरम्यान झाला आहे. त्याचे प्रमाण २४ टक्के एवढे आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५७ महिला तर १६२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा निष्पन्न झाल्यानंतर केवळ २४ तासांतच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही १६५ एवढी असून, हे प्रमाण १८.४८ टक्के एवढे आहे. तर कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या १९० एवढी आहे. २१२ रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांच्या कालावधीत झाला आहे. मृत्यू पावलेल्या या रुग्णांमध्ये ६५ महिला आणि १४७ पुरुषांचा समावेश आहे. तर १४ दिवसांनंतर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०७ एवढी असून, त्याचे प्रमाण ११.९८ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातही कोरोना निष्पन्न झाल्यानंतर चौथ्या ते सातव्या दिवसापर्यंत रुग्णांना धोका अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. या काळात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. १३ मेपर्यंत जिल्ह्यात ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये २८९ महिला आणि ६०१ पुरुषांचा समावेश आहे.