जिल्ह्यात कोरोनाच्या २१ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:14+5:302021-04-30T04:22:14+5:30
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी २१ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १,२६५ नवे रुग्ण नोंद झाले आहेत. बाधित रुग्णांच्या ...

जिल्ह्यात कोरोनाच्या २१ रुग्णांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी २१ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १,२६५ नवे रुग्ण नोंद झाले आहेत. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सुरू झालेले सत्र थांबत नसल्याने जिल्हावासीयांच्या काळजाचा ठोका वाढत आहे.
मागील एक महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गाने जिल्हावासीयांना त्रस्त केले आहे. दररोज रुग्णांसह मृत्यूची संख्या वाढू लागल्याने धडकी भरत आहे. २९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील २१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. येथील जिल्हा रुग्णालयात सात, आयटीआय हॉस्पिटलमध्ये पाच, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या २१ रुग्णांमध्ये १४ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही दररोज वाढत असून, गुरुवारी प्रशासनाला तीन हजार ९११ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या तीन हजार २३३ अहवालांमध्ये १०३५, तर रॅपिड टेस्टच्या ६७८ अहवालांमध्ये २३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३५ हजार ४३५ झाली असून, त्यातील २६ हजार ७१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८७२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या सात हजार ८४० रुग्ण उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३७, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २७७, अक्षदा मंगल कार्यालयात १५०, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये १५८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार ३१३ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत.