२० वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले जाणार प्रशिक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:06+5:302021-06-09T04:22:06+5:30
परभणी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील २० वैद्यकीय अधिकारी आणि ५० परिचारिकांना प्रशिक्षित केले जाणार असून, त्याच्या ...

२० वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले जाणार प्रशिक्षित
परभणी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील २० वैद्यकीय अधिकारी आणि ५० परिचारिकांना प्रशिक्षित केले जाणार असून, त्याच्या पहिल्या टप्प्यात ६ वैद्यकीय अधिकारी आणि १० परिचारिकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे ७ जूनपासून सुरू झाले आहे.
कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात उपाययोजना सुरू झाली आहे. बालकांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारीवर्गाची आवश्यकता भासणार असल्याने त्यादृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात कोरोना हा नवीन आजार असल्याने कोरोना बाधित बालकांवर कशा पद्धतीने उपचार करायचे, याविषयी अनभिज्ञता आहे. कोरोना काळात मुलांना वापरली जाणारी औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नेमके कशा स्वरुपाचे असावे? याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अनेक परिचारिकांनी आतापर्यंत बालरोग विभागात काम केले नाही. त्यामुळे त्यांनाही प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.
याच अनुषंगाने ७ जूनपासून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. विभागीय स्तरावर असलेल्या या प्रशिक्षणात परभणी जिल्ह्यातून ५ वैद्यकीय अधिकारी, १ परिसेविका आणि १० अधिपरिचारिका सहभागी झाल्या आहेत. औरंगाबाद येथील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे, सहाय्यक आयुक्त रश्मी खांडेकर, सहाय्यक प्रा. तृप्ती जोशी, येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर सुरवसे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. १४ जूनपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे.
१० वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश
जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन एम. बी. बी. एस. असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून एकूण २० वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षित केले जाणार आहेत. सध्या ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणात सहभाग असून, हळूहळू त्यात वाढ केली जाणार आहे.
बालकांसाठी कोविड रुग्णालय
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ५० खाटा सज्ज ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे संसर्ग कशा पद्धतीने पसरतो, यावर पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ४०० खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.