निराधारांसाठी २० कोटींचे अनुदान वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST2021-04-25T04:16:59+5:302021-04-25T04:16:59+5:30
निराधारांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यातून या निराधारांना त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा ...

निराधारांसाठी २० कोटींचे अनुदान वितरीत
निराधारांसाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यातून या निराधारांना त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. या अनुषंगाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत २०२१ ते २०२२ या कालावधीसाठी जिल्ह्याला २० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी १२ कोटी १० लाख ४० हजार १०० रुपये तर याच योजनेत अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी ९ लाख ७० हजार रुपये आणि अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी १ कोटी २५ लाख ६३ हजार २०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ३ कोटी ७९ लाख ३६ हजार आणि याच योजनेतील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी ३९ लाख ८ हजार ४०० रुपये व अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी ४५ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी १ लाख २६ हजार ६०० तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत १ कोटी ५७ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ९ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधी वितरणाचे आदेश राज्याच्या समाजकल्याण विभागाने २२ एप्रिल रोजी काढले आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. अशात पैसे नसल्याने निराधारांचे हाल होत आहेत. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाने निराधारांसाठी निधी देऊन संकट काळात त्यांना मोठा आधार दिला आहे. निधी मंजुरीनंतर काही दिवसांतच संबधित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे निराधारांना दिलासा मिळाला आहे.