पीककर्जासाठी रांगेत थांबलेल्या शेतकऱ्याचे १८ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:27+5:302021-06-10T04:13:27+5:30
जिंतूर तालुक्यातील दाभा येथील शेतकरी विठ्ठल उत्तमराव घुगे हे बियाणे, खते खरेदी तसेच पीक कर्जाचा अर्ज करण्यासाठी ८ जून ...

पीककर्जासाठी रांगेत थांबलेल्या शेतकऱ्याचे १८ हजार लंपास
जिंतूर तालुक्यातील दाभा येथील शेतकरी विठ्ठल उत्तमराव घुगे हे बियाणे, खते खरेदी तसेच पीक कर्जाचा अर्ज करण्यासाठी ८ जून रोजी जिंतूर शहरात आले होते. सकाळी ११.३० च्या सुमारास ते शहरातील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या समोर पीक कर्जाचा अर्ज देण्यासाठी रांगेत थांबले. दुपारी ३ वाजेपर्यंत नंबर आला नसल्याने अर्ज स्वीकारण्याची वेळ संपल्याचे बँकेने सांगितले. त्यामुळे ते दुपारी ३.१५ च्या सुमारास ते एका दुकानात मोटारीचे वायर खरेदी करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पँटच्या खिशात पाहिले असता खिशातील १८ हजार रुपये दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी तातडीने बँक परिसरात जाऊन पाहिले असता तेथेही काहीही आढळले नाही. याबाबत त्यांनी विचारपूस केली असता पैशांबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी ८ जून रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.