परभणीसाठी १५ हजार क्विंटल बियाणांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:35+5:302021-05-13T04:17:35+5:30
खरीप हंगामाच्या अनुषंगाने परभणी येथील महाबीजच्या कार्यालयात आ. डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी कृषी व महाबीजच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक ...

परभणीसाठी १५ हजार क्विंटल बियाणांची गरज
खरीप हंगामाच्या अनुषंगाने परभणी येथील महाबीजच्या कार्यालयात आ. डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी कृषी व महाबीजच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले की, या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार आहे, तर कपाशीचा पेरा जास्त होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व भार सोयाबीनवर येणार असल्याची परिस्थिती आहे. परिणामी, सोयाबीनची मागणी वाढणार आहे. त्यामुळे बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यासाठी आत्ताच तयारी करावी लागेल. शेतकऱ्यांना हे बी-बियाणे उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी आपला प्रस्ताव महाबीजकडे पाठवावा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर त्यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना जिल्ह्यातील बियाणांची आवश्यकता सांगितली. यावेळी रेखावार यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महाबीजकडे १५ हजार क्विंटल बियाणे मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी सोयाबीनच्या बियाणांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले होते. यावर्षी अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, तालुका प्रमुख नंदू अवचार, दिनेश बोबडे, उपशहर प्रमुख संभानाथ काळे, नगरसेवक सुशील कांबळे, विक्की सोनेकर, अशोक गव्हाणे, प्रकाश डहाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.