एका दिवसात १२ हजार ९१४ प्रकरणे निकाली; परभणीत राष्ट्रीय लोक अदालत
By राजन मगरुळकर | Updated: September 10, 2023 13:59 IST2023-09-10T13:58:50+5:302023-09-10T13:59:51+5:30
या प्रकरणांच्या माध्यमातून तब्बल २२ कोटी २५ लाख ७४ हजार ३२ रुपयांची वसुली झाली आहे.

एका दिवसात १२ हजार ९१४ प्रकरणे निकाली; परभणीत राष्ट्रीय लोक अदालत
परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी परभणी जिल्ह्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. यामध्ये एका दिवसात एकूण १२ हजार ९१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांच्या माध्यमातून तब्बल २२ कोटी २५ लाख ७४ हजार ३२ रुपयांची वसुली झाली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकार्यांच्या वतीने शनिवारी परभणी न्यायिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.जी.लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बँक वसुली प्रकरणे. मोटार अपघात. कौटुंबिक वाद. कामगार. भूसंपादन. वीज प्रकरणी (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरण वेतन व भत्त्याची सेवा विषयक प्रकरणे, महसूल आणि दिवाणी स्वरूपाची इतर प्रकरणे, बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वितेसाठी परभणी न्यायिक जिल्हा अंतर्गत कार्यरत सर्व न्यायाधीश, सर्व वकील संघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
एकूण प्रकरणे, वसूली
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे १२६४ - वसुली १५ कोटी ५७ लाख ९३ हजार १६ रुपये
स्पेशल ड्राईव्ह २५६, २२८ सीआरपीसी - १०२८ प्रकरणे
वाद दाखल पूर्व इतर प्रकरणे १०६२२ - वसुली सहा कोटी ६७ लाख ८१ हजार १६ रुपये
एकूण प्रकरणे १२९१४ : एकूण वसुली २२ कोटी २५ लाख ७४ हजार ३२ रुपये