जिल्ह्यातील ११६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:52+5:302021-06-05T04:13:52+5:30
देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या ...

जिल्ह्यातील ११६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर
देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषत: शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अधिक वेगाने फैलावल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना परभणी जिल्ह्यातील ११६ गावांनी सर्वच इतर गावांना चकित केले आहे. या गावांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेमध्ये एकही कोरोनाबधित रुग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांना विलगीकरणात ठेवणे तसेच मास्क, सॅनिटायझरचा प्रभावी वापर आदी बाबी या गावांमधील ग्रामस्थांनी कटाक्षाने पाळल्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत संशयित वाटणाऱ्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करणे तसेच त्याची योग्य ती काळजी घेणे आदींबाबतही दक्षता सामूहिक प्रयत्नातून घेण्यात आली. परिणामी देशभरात धुमाकूळ घालणारा कोरोना या गावांमध्ये पोहोचू शकला नाही. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ, त्यांच्या एकजुटीला आणि कोरोनाबाबतच्या सजगतेला देत आहेत.
गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक गावे
जिल्ह्यात एकूण ११६ गावे कोरोनापासून दूर राहिली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२ गावे गंगाखेड तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ जिंतूर तालुक्यातील २३, पालम तालुक्यातील २२, मानवत व परभणी तालुक्यातील प्रत्येकी ४, पूर्णा तालुक्यातील ६, सेलू तालुक्यातील ५, सोनपेठ तालुक्यातील १२ आणि पाथरी तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या करणे, त्यांचे विलगीकरण करणे तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले. दुसऱ्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत संशयितांच्या चाचण्या, लसीकरण जनजागृती आदी उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने गाव कोरोनापासून दूर ठेवण्यात यश आले.
- जनाबाई संतोष खराबे, सरपंच, पार्डी टाकळी, ता. मानवत
कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची चाचणी करूनच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. गावातील प्रत्येकाने मास्क व आणि सॅनिटायझरचा वापर केलाच पाहिजे, असे सांगण्यात आले. ग्रामस्थांनीही नियमांचे पालन केले तसेच गावात स्वच्छतेवर भर देण्यात आला. त्यामुळे गाव कोरोनापासून दूर राहिले.
-स्वाती रामेश्वर जाधव, सरपंच, मोहळा, ता. सोनपेठ