लसीअभावी जिल्ह्यातील १०३ केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST2021-05-14T04:17:29+5:302021-05-14T04:17:29+5:30
१ मेपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू केलेले लसीकरण मागच्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे. सध्या ४५ ...

लसीअभावी जिल्ह्यातील १०३ केंद्र बंद
१ मेपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू केलेले लसीकरण मागच्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे. मात्र, या नागरिकांसाठी देखील जिल्ह्यात लस उपलब्ध नाही. त्यामुळे गुरुवारी १०३ लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. परभणी शहरातील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रासह ग्रामीण भागातील काही केंद्र अशा एकूण ४७ केंद्रांवर दिवसभरात लसीकरण सत्र चालविण्यात आले. राज्य शासनाने यापूर्वीच १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठीचे लसीकरण बंद केले आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यातही दुसरा डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गुरुवारी दिवसभरात ४३१७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
परभणीत आज नऊ केंद्रांवर सत्र
१४ मे रोजी महानगरपालिकेच्या वतीने ९ केंद्रांवर सत्र चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. शहरातील इनायतनगर, साखला प्लॉट, वर्मा नगर, दर्गा रोड, जायकवाडी, शंकरनगर, खंडोबा बाजार, खानापूर या मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे नानलपेठ भागातील बालविद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणीही केंद्र सुरू केले आहे.