आपल्या गावात आपला उद्योग

By Admin | Updated: May 22, 2014 15:43 IST2014-05-22T15:43:43+5:302014-05-22T15:43:43+5:30

शाळेनं ‘ढ’ ठरवलेल्या मुलांना कौशल्य शिकवून आपल्या पायावर उभं करणार्‍या पाबळच्या प्रयोगशाळेची गोष्ट

Your industry in your village | आपल्या गावात आपला उद्योग

आपल्या गावात आपला उद्योग

आनंद गोसावी, प्राचार्य, विज्ञान आश्रम, पाबळ

आपल्या हातात जर कौशल्य असेल, आपल्याला आपला उद्योग गावातच सुरू करता येत असेल 

तर शहरात धक्के खायचे कशाला?
----------------
आपला देश विकासाच्या वाटेवर निघाला आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे आणि दरवर्षी रोजगारक्षम तरुण मनुष्यबळाची संख्याही वाढते आहे. एकीकडे कारखानदारी झपाट्याने वाढते आहे तर दुसरीकडे शिक्षणव्यवस्थेपुढे अनेक समस्या उभ्या राहत आहेत आणि यातूनच सामान्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, की हे पुस्तकी शिक्षण खरंच गरजेचं आहे का? विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना असं नेहमी वाटतं की आपण एवढं शिक्षण घेतो आहोत, पण आपल्याला नोकरी मिळेल का? हाताला काम मिळेल का?
अनेकदा तर डिग्री आहे पण रोजगार नाही, नोकरी मिळाली तरी आपल्याच विषयातील प्रत्यक्ष काम आपल्याला जमत नाही अशी स्थिती. त्यात ज्या मुलांचं शिक्षण कमी त्यांना तर काही वाटच दिसत नाही. चहुबाजूनं अंधार. जे आवडतं ते शिकता येत नाही आणि जे शिकतोय ते आवडत नाही, अशीही अनेकांची गत. खरंतर प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याला जे आवडतं ते शिकलं पाहिजे, त्यातून शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे. जीवनाशी संबंध जोडणार्‍या शिक्षणपद्धतीची आज गरज आहे. 
पाबळचा ‘विज्ञान आश्रम’ याच धर्तीवर शिक्षण व संशोधन क्षेत्रात काम करत आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीने नाकारलेली तसेच प्रचलित शिक्षणपद्धतीत रस नसणारे विद्यार्थी इथं शिक्षण घेत असतात. प्रचलित शिक्षणपद्धतीत असलेल्या अनेक त्रुटी ओळखून डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ साली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दुर्गम अशा पाबळ या गावी विज्ञान आश्रम सुरू केला. 
आश्रम सुरू करण्यामागे वेगळी शिक्षणसंस्था सुरू करणे हा हेतू न ठेवता डॉ. कलबाग यांनी प्रचलित शिक्षणपद्धतीला पयार्यी शिक्षणपद्धती देऊन गावाचा विकास घडविणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. ‘शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास’ ही संकल्पना त्यांनी मांडली. मुलांना रोजगारकौशल्य प्राप्त व्हावं यासाठीचे हे विशेष अभ्यासक्रम आहेत. तरुणांनी आपापल्या कौशल्याचा वापर करून आपापल्या गावातच रोजगार सुरू करावा यासाठी या अभ्यासक्रमांचा विशेष उपयोग होतो.
 
‘मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम’ 
(Diploma in Basic Rural Technology ) 
१६ ते २१ वयोगटातल्या किमान आठवी पास असलेल्या कुणालाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो. हा अभ्यासक्रम प्रमुख चार विभागांत शिकविला जातो. 
१) अभियांत्रिकी विभाग - यात वेल्डिंग फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम, अभियांत्रिकी चित्रकला ही कौशल्ये शिकविली जातात. 
२) ऊर्जा व पर्यावरण विभाग - या विभागात ऊर्जा, ऊर्जेची विविध साधनं, ऊर्जा निर्मिती, तिचा वापर, वायरिंग करणं, इलेक्ट्रिक साधनांची दुरुस्ती करणं, पर्जन्यमापन, समतल चर, जमीन मोजण्याचं तंत्रज्ञान, प्लेन टेबल सर्वेक्षणातून भूभागाचा नकाशा तयार करणं, यासारखी कौशल्ये शिकविली जातात.
३) गृह व आरोग्य विभाग - या विभागात स्वत:चं आरोग्य, स्वच्छता, योगासनं, संतुलित आहार, पदार्थ बनविणं, त्यावर प्रक्रिया करणं, त्याची विक्री करणं, शिवणकाम, विणकाम, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणे, पाणी तपासणी, इ. कौशल्ये शिकविली जातात.  
४) शेती व पशुपालन विभाग - या विभागात शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धती, अंदाजपत्रक, शेतीचा जमाखर्च, नफा-तोटा पत्रक तयार करणं, गाई, शेळी, कोंबड्या यांचं व्यवस्थापन, रोगप्रतिबंधन, कृत्रिम रेतन, शेतीत पूर्ण एक पीक घेणो, या सोबतच संगणकाचा वापर करण्यास शिकविलं जातं. 
एका विभागाचे तीन महिने याप्रमाणे वर्षभरात चारही विभागांतून विद्यार्थी विविध कौशल्यांचं ज्ञान हस्तगत करतो. हा अभ्यासक्रम शिकत असताना मुलांना कमीत कमी २000 रुपये कमविण्याची अट आहे. मुलांनी जी कौशल्ये आत्मसात केली आहे त्या कौशल्यांच्या आधारे अर्थार्जन करता येते की नाही हे मुलांनी लगेच तपासून पाहावं हा या अटीमागचा मुख्य हेतू आहे. सरासरी आठ ते दहा हजार रुपये अनेक जण शिक्षण सुरू असतानाच कमवू लागतात.
 हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आज भारतभरातून मुलं येतात. दरवर्षी ६0 विद्यार्थ्यांना प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. दोन वर्षं कालावधी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, दिल्ली या संस्थेची मान्यता असलेला हा अभ्यासक्रम. या कोर्समध्ये एक वर्ष निवासी शिक्षण, तर दुसर्‍या वर्षी त्या मुलाच्या आवडीच्या क्षेत्रात उमेदवारी असं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेली मुलं आज आपापल्या गावात उद्योग उभारून स्वत:च्या पायावर उभी आहेत. हा कोर्स म्हणजे केवळ व्यावसायिक शिक्षण नसून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभं राहून उद्योग करण्याची क्षमता, आत्मविश्‍वास व प्रेरणा देणारा अभ्यासक्रम आहे
 
प्रवेश कधी? कसा?
१ मे पासून प्रवेश सुरू होतात.
फी २३000 रुपये आहे. त्यात भोजन व निवास खर्चाचा समावेश आहे.
एक वर्ष निवासी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची आश्रम कॅम्पसमध्ये मुलाखत घेतली जाते.
त्यातून आवडीच्या क्षेत्रात पुढील एक वर्षासाठी उमेदवारी दिली जाते. त्या दरम्यान त्या विद्यार्थ्यास ५ ते १0 हजार दरम्यान विद्यावेतन मिळते. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग या संस्थेतर्फे  विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. 
ज्यांना आपला उद्योग सुरु करायचा आहे अशा व्यक्तींना अल्पमुदतीच्या स्वतंत्र अभ्यासक्रमांतून प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणाचा कालावधी एक दिवसापासून तीन महिन्यापर्यंत आहे. त्या व्यक्तीची मुलाखत घेऊन त्याच्या आसपासच्या परिसराचा, स्थानिक गरजेचा अभ्यास करून, त्या व्यक्तीतील सुप्त कौशल्यांचा शोध घेऊन प्रशिक्षण दिलं जातं. तसेच उद्योग उभारण्यास मदत केली जाते. 
उद्योग कसा सुरू करावा, कर्ज कुठून मिळतं याचं मार्गदर्शनही केलं जातं.
एक ब्रिज लोन योजनाही आश्रमाच्या वतीनं राबवली जाते. ज्या विद्यार्थ्यांना बँकेकडून कर्ज मिळू शकत नाही. त्यांना विज्ञान आश्रम उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करून देते. ते पैसे टप्प्याटप्प्यानं आश्रमाला परत करणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असतं.
 
 
विज्ञान आश्रमात शिकवले जाणारे अभ्यासक्रम
वेल्डर कम फॅब्रिकेटर  - १ वर्ष 
वेल्डिंग फॅब्रिकेशन    - ३ महिने
बेसिक इलेक्ट्रिक             - ३ महिने
मोटर रिवायडिंग           - २ महिने 
सर्वेक्षण तंत्रज्ञान           - ७ दिवस 
खाद्यपदार्थ निर्मिती  - ३ महिने
शेती व्यवस्थापन    - ३ महिने
पॉलीहाउस व्यवस्थापन    - २ महिने
पोल्ट्री (कुक्कुटपालन)  - २ महिने
 शेळीपालन            - १५ दिवस
दुग्धव्यवसाय व्यवस्थापन  - २ महिने 
फॅब लॅब             - १ महिना*
 
 

 

Web Title: Your industry in your village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.