खेडय़ापाडय़ात तरुण उद्योग
By Admin | Updated: May 21, 2015 20:31 IST2015-05-21T20:25:33+5:302015-05-21T20:31:19+5:30
जगभरातल्या लोकांनी मुख्यत: उद्योग आणि कार्पोरेट जगानं हे मान्य केलंय की, आपण भारतीय ‘जुगाड’ करण्यात एकदम एक्सपर्ट आहोत

खेडय़ापाडय़ात तरुण उद्योग
>ग्रामीण उद्योजकता म्हणजे नक्की काय?
जगभरातल्या लोकांनी मुख्यत: उद्योग आणि कार्पोरेट जगानं हे मान्य केलंय की, आपण भारतीय ‘जुगाड’ करण्यात एकदम एक्सपर्ट आहोत.
आपण खटपटी लटपटी करतो, आहे त्यात भागवत त्यातून नवीन काहीतरी घडवतो आणि मुख्य म्हणजे टिच्चून टिकून राहतो. टिकता टिकता आपलं डोकंही सुसाट चालतं आणि त्यातून एकसेएक नवनवीन क्रिएटिव्ह आयडिया तयार होत राहतात. त्या विरून जातात किंवा इतर लोक त्याला हसतात म्हणून प्रत्यक्षात काही समोर येत नाही. किंवा पैसा नाही म्हणून त्या कागदावरही येत नाहीत. अनेकदा तर आपल्याला सुचलेली आयडिया चांगली आहे, तिचं नीट मार्केटिंग केलं तर त्यातून काहीतरी उत्तम साकारू शकेल हेदेखील अनेकांच्या लक्षातही येत नाही.
आणि असं असूनही आजच्या घडीला अहमदाबादच्या नॅशनल इनोव्हेशनल फाउंडेशनकडे पन्नास हजारांहून अधिक इनोव्हेशनच्या आयडिया रजिस्टर झालेल्या आहेत. आणि ही इनोव्हेशन्स मुख्यत्वे ग्रामीण भागातील मुलांनी केलेली आहेत!
हे सारं काय आहे?
तर नव्या महत्त्वाकांक्षा जागा झालेल्या भारतातल्या ग्रामीण भागातही आता जबरदस्त ताकद आहे हे जसं जगाला कळलंय तसं तिथं राहणा:यांनाही कळतं आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरानं शेती बदलत आहे. त्यामुळे काही ग्रामीण तरुणांनाही आता हे मान्य नाही की आपण फक्त शेतीतून कच्च माल काढायचा आणि तो कवडीमोल दरात विकायचा.
उत्पादन-प्रक्रिया आणि बाजारपेठ या तीनही टप्प्यांत आपणच काम करून नवीन उद्योग का सुरू करू नयेत, असा हा विचार आहे.
या विचाराला आता भारत सरकार विविध योजनांमार्फत प्रोत्साहन देतं आहे. अनेक संस्थांनी नीट प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. आणि मुख्य म्हणजे हे उघड दिसतं आहे की कृषी आधारित उत्पादनांना येत्या काळात मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
त्यामुळेच एक नवीन उद्योजकता आकार घेते आहे.
तिचं नाव,
ग्रामीण उद्योजकता अर्थात रुरल आंत्रप्य्रुनर.
मुख्य म्हणजे गावातच छोटुसा व्यवसाय सुरू करावा, दुसरं काहीच जमत नाही, शिक्षण नाही, नोकरी मिळत नाही म्हणून छोटंमोठं काहीतरी टामटूम करण्याचं हे काम नाही!
शहरात जसे नीटनेटके उद्योग सुरू केले जातात, ते प्रोफेशनली चालवले जातात, प्रॉडक्ट ते मार्केट ही प्रक्रिया अत्यंत प्रोफेशनली होते, त्यासाठी प्रशिक्षण दिलं घेतलं जातं.
तसंच आता ग्रामीण उद्योजकतेचं होतं आहे!
आपण ग्रामीण उद्योजक आहोत ही नव्या काळात एक भूषणावह गोष्ट ठरणार आहे!!
Aुरुरल आंत्रप्य्रुनरशिप म्हणजे नक्की काय?
एका वाक्यात सांगायचं तर, ग्रामीण भागात ग्रामीण लोकांच्याच गरजा ओळखून केले जाणारे उद्योग. या उद्योगांतून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, विकासाच्या वाटेवर त्यांना चालता येईल, या उद्योगातून त्यांचं रोजचं जगणं सोपं होईल.
मात्र हे उद्योग पूर्णत: ‘प्रोफेशनल’ असतील, समाजाभिमुख तरीही प्रोफेशनल. व्यावसायिक पण नफेखोर नाही.
मुख्य म्हणजे अशी काही अट नाही की, हे उद्योग फक्त शेतीशीच संबंधित असावेत. ते मुख्यत्वे शेतीशी संबंधित आजतरी आहेत, कारण ग्रामीण भागात शेती हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं हे उद्योग ग्रामीण भागातील तरुणांनीच करावेत असंही नाही. शहरी मुलंही ते करू शकतात.
त्यासाठी हवं मात्र प्रशिक्षण, उद्योगाची कल्पना आणि उद्योग यशस्वी करून दाखवत समाजभान जपण्याचं पॅशन!!
या उद्योगाची गरज काय?
1) भारतात गेल्या पाच दशकांत जे उद्योग वाढले ते शहरात वाढले. त्यामुळे ग्रामीण भागातील माणसं रोजगारासाठी मोठय़ा प्रमाणात शहरांकडे धावली. शहरातले लोंढे वाढले आणि ग्रामीण भागात विकासाच्या प्रश्नासह गरिबी कायम राहिली.
2) त्यात शेती हाच आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा, आजही देशात 7क् टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण शेतीचे तुकडे झाले आणि हवामान लहरी. शेतीत भागत नाही ही तक्रार आहेच.
3) त्यामुळे शेतीला जोड म्हणूनही शेतीआधारित उत्पादनांमधून येणारा पैसा थेट ग्रामीण भागात पोहचवण्यासाठीही या ग्रामीण उद्योजकतेची गरज आहे.
फायदे कुठले? कुणाला?
1) हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की, ग्रामीण भागात उद्योजकतेला प्रोत्साहन देत उद्योग सुरू झाले तर त्याचा फायदा नक्की कुणाला?
- ग्रामीण जनतेला! स्थानिक लोकांना!
2) मुळात या उद्योजकतेचा हेतूच हा आहे की, ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे. ग्रामीण माणसांच्या हाती पैसा आला पाहिजे.
3) शहरी-ग्रामीण ही उत्पन्नाची दरी कमी करण्यासाठीही या उद्योगांचा फायदा होईल.
4) मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील धडपडय़ा उद्योगी तरुणांना याचा जास्त फायदा होईल. कारण त्यांना ग्रामीण प्रश्नांची माहिती चांगली आहे. शेतीची जाण आणि कामाची सवयही आहे.
5) याशिवाय उद्योग करताना करात सवलत, स्वस्त कच्च माल आणि मनुष्यबळही मिळेल. पुन्हा समाजात मानसन्मान वाढतो आणि पैशासह आदर मिळतो. इतरांसाठी हे ग्रामीण उद्योजक प्रेरणास्त्रोत ठरतात.
ग्रामीण उद्योजक कुणी व्हावं?
1) खेडय़ातल्या तारुण्याला संधी जास्त असली, तरी ज्यांना खेडय़ापाडय़ात जाऊन काम करायचंय, समाजासाठी कळकळ आहे त्या शहरी मुलांनाही संधी आहेच. मात्र हे नुस्तं काम नाही, फक्त धंदा नाही हे त्यानं व्यवसाय सुरू करताना लक्षात ठेवावं.
2) ग्रामीण उद्योजक व्यक्तिवादी-नफेखोर नसावा. त्याला फक्त मार्केटची नाही, तर सामाजिक प्रश्नांचीही जाण असावी. आपल्या कुटुंबाइतका समाजाचा विचार करण्याची व्यापक दृष्टीही असावी.
3) फक्त स्वत:चा नाही तर सगळ्यांचा विकास हे त्याचं तत्त्व असावं.
समस्या कुठल्या?
1) ग्रामीण भागातीलच काय पण शहरी तारुण्यालाही या संधीची फारशी माहितीच नाही.
2) पायाभूत सुविधा नाहीत. वीज, पाणी आणि तंत्रज्ञान यांची आबाळ आहेच.
3) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती कमी पडते. ग्रामीण भागात आपण उद्योग सुरू करू शकतो असा विचारही तरुण करत नाही.
4) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग नाही. व्यवसाय यशस्वी करायचा तर प्रशिक्षण हवं, ते प्रशिक्षणही मिळत नाही आणि अनेकजण नुस्त्या तक्रारी करत काही हातपाय हलवतही नाहीत.