ड्रॉप घ्यायचाच यंदा, असं ठरवलंय?
By Admin | Updated: June 5, 2014 18:18 IST2014-06-05T18:18:32+5:302014-06-05T18:18:32+5:30
यंदा ना? - यंदा ड्रॉप, बघू काय ते नेक्स्ट इयर. असं सहज सांगणारे हल्ली अनेक जण मिळतात. त्यातही ड्रॉप घेणार्यांत आघाडीवर सायन्सवाले. मेडिकल-इंजिनिअरिंगची परीक्षा होताक्षणी, रिझल्ट येण्यापूर्वीच त्यांनी ठरवून टाकलेलं असतं की, यंदा पेपर भंगार गेलेत.

ड्रॉप घ्यायचाच यंदा, असं ठरवलंय?
>यंदा ना? - यंदा ड्रॉप, बघू काय ते नेक्स्ट इयर.
असं सहज सांगणारे हल्ली अनेक जण मिळतात. त्यातही ड्रॉप घेणार्यांत आघाडीवर सायन्सवाले. मेडिकल-इंजिनिअरिंगची परीक्षा होताक्षणी, रिझल्ट येण्यापूर्वीच त्यांनी ठरवून टाकलेलं असतं की, यंदा पेपर भंगार गेलेत. आपला स्कोअर काही बरा येणार नाही, भुक्कड कॉलेजला अँडमिशन घेऊन शिकण्यात काही पॉइंट नाही. ते पालकांना सांगून टाकतात की, मी ड्रॉप घेणार आहे. वर्षभर पुन्हा सीईटीची तयारी करीन, चांगला स्कोअर काढीन मग पाहू..
अनेक पालकांना हे ड्रॉप प्रकरण कळतही नाही, झेपतही नाही. पण आपल्या हुशार मुलानं असा निर्णय ठामपणे घेतलाय म्हणजे तो योग्यच असणार, असा पालक समज करून घेतात. तसंही मुलांना सपोर्ट करण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात फार काही नसतंच.
मग अनेक मुलं ड्रॉप घेतात. ड्रॉप घेतलेल्यांना स्पेशल कोचिंग देणारे, त्यांना हमखास उत्तम स्कोअर आणून देणारे बरेच खासगी क्लासेस सध्या सुरू झालेत. त्या क्लासला अनेक जण जातात. त्याची लाखलाख रुपये फी भरतात. आपल्या गावात, शहरात तसे क्लासेस नसतील तर अशा क्लासेसच्या फॅक्टर्या चालणार्या शहरात जाऊन राहतात. तिथं राहण्या-जेवण्याचा खर्च वाढतो तो वेगळाच.
तरीही हे सारं करतातच.
का? तर आजकाल अनेक मुलामुलींसाठी ड्रॉप घेणं हे एक स्वत:च्या आत्मविश्वासाचं स्टेटमेण्ट आहे. आपण वेगळे आहोत, हुशार आहोत तर स्वत:ला आणखी एक संधी देत जे आहे ते नाकारत अधिक मिळवण्याची हुक्की आहे.
काही जणांच्या बाबतीत ते ठरवतात तसं होतंही. ड्रॉप घेऊन उत्तम तयारी करतात. भरपूर स्कोअर काढतात. आणि जे हवं तेच कॉलेज मिळवून आपलं करिअर घडवायला निघूनही जातात. आपला निर्णय सार्थ ठरवतात.
पण सगळ्यांनाच ते जमत नाही. अनेकांचा ड्रॉप घेतानाचा स्वत:चा अंदाज चुकतो. त्यांचं अभ्यासातून लक्ष उडतं. मित्र पुढे निघून जातात. विशेषत: तरुणांच्या बाबतीत हे जास्त घडतं. त्यांच्या मैत्रिणी, अनेकदा तर गर्लफ्रेण्डही पुढे निघून जाते. तिचं जग बदलतं. अभ्यासात मन लागत नाहीच, त्यात ब्रेकपही होतो. मित्र तुटतात. आणि वर्ष वाया जातंय नावाचं भूत डोक्यावर नाचायलाही लागतं.
त्यात खरंच वर्ष वाया जातं, पहिल्या वर्षीपेक्षा अनेकांचा ड्रॉप नंतरच्या वर्षी कमीच स्कोअर येतो. पुरतं ड्रिपेशन येतं आणि स्वत:वरचा विश्वासही उडून जातो.
अशी खचलेली, हरलेली अनेक ‘हुशार’ मुलं हल्ली कौन्सिलरकडे भेटतात.
त्या मुलांना आणि त्यांच्यासारख्याच ड्रॉप घ्यायचाच म्हणून हटून बसलेल्या मुलामुलींना करिअर कौन्सिलर सतत बजावताहेत की, ड्रॉप घेऊच नका. या परीक्षा अवघडच आहेत, स्पर्धा भयंकर वाढलेली आहे. जो निकाल यावर्षी टफ लागला असं वाटतं, तो पुढच्या वर्षी कमी टफ लागेल हे कशावरून? त्यापेक्षा जो यंदाचा जेईई किंवा एमईईटीचा स्कोअर आहे, त्यात पीसीएमचे मार्क अँड करा. त्यातल्या त्यात चांगली इन्स्टिट्यूट निवडून प्रवेश घ्या. पुढच्या वर्षी यंदापेक्षा कमी स्कोअर आला तर काय कराल? असाही विचार करून पाहा.
ड्रॉप घेणं, वर्षभर गॅप घेऊन पुढे करिअर प्लॅन करणं हे लांबून खूप रोमांचक, आव्हानात्मक वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र तिथं निभाव लागणं अवघड आहे.
ड्रॉप घेण्यापूर्वी निदान या सगळ्याचा तरी विचार कराच.