दोस्तीचे पूल बांधतील का इंडियावाले?

By Admin | Updated: December 18, 2014 18:34 IST2014-12-18T18:34:06+5:302014-12-18T18:34:06+5:30

आपल्याच देशातला ईशान्य कोपरा, तिथली माणसं, त्यांची आपली साधी ओळख नाही, आपल्याला तो देशच माहिती नाही, याची लाजच वाटते, असं का म्हणताहेत, हे तरुण दोस्त.

Will Indiawale build friendship bridge? | दोस्तीचे पूल बांधतील का इंडियावाले?

दोस्तीचे पूल बांधतील का इंडियावाले?

पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीच्या ‘ज्ञानसेतू’ उपक्रमाद्वारे ईशान्य भारतात जाऊन वेगळा भारत पाहणार्‍या तरुण दोस्तांशी खास गप्पा..

 
-  हीनाकौसर खान-पिंजार
 
बरूणा. बुटकीशी, गोरीगोरी, बारीक डोळ्यांची, पसरट नाकाची. तिला पाहिलं की ती चिनी किंवा नेपाळी वाटायची. म्हणजे आम्ही वर्गातील सगळ्या मुलांनी तसाच ग्रह करून घेतला होता की, ती काही भारतीय नाही.  तिच्याशी कोणी फारसं बोलतही नसे. मग हळूहळू बोलायला लागलो, तेही इंग्रजीतच. तिला इंग्रजीही फारसं येत नसे. म्हणून मग बोलणंही कमीच व्हायचं. मग गॅदरिंग आलं, तर तिनं  अतिशय सुरेल आवाजात ‘कहने को जश्ने बहारा है..’  हे हिंदी गाणं म्हटलं. सगळ्यांनी आश्‍चर्यानं तोंडात बोटंच घातली. चौकशी केल्यावर कळलं की, ती आसामी आहे. म्हणजे आपलीच. भारतीयच. आणि केवळ ती आपल्या तोंडावळ्याची दिसत नाही म्हणून आपण तिला ‘परकं’ समजत होतो?
या आपल्या अज्ञानाची लाजच वाटली. 
- ईशान्य भारतात जाऊन आलेली एक मैत्रीण कळवळून सांगत होती. आपणच किती अज्ञानी, आपल्याला आपला देश माहिती नाही, आपली माणसं माहिती नाहीत, ओळखता येत नाहीत. भारताच्या ईशान्येला असलेली सात छोटछोटी राज्यं, आपण माहितीही करून घेत नाहीत याविषयी खंत वाटणारी काही तरुण मित्रमैत्रिणी जमली होती. हे सारे एकदा किंवा अनेकदा ईशान्य भारतात जाऊन आलेले, तो ‘आपला’ देश पाहून आलेले तरुण दोस्त. काही शिकणारे, काही नुकतं शिक्षण संपवून नोकरीला लागलेले.  पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका यांनी जाणीव युवा आणि दिशा आयसर यांच्या मदतीने विज्ञानाचा हात धरत दुर्गम भागात जायचं ठरवलं. ‘ज्ञानसेत’ू असा हा दुर्गम भागांचा प्रवास सुरू झाला आणि त्यातून ही मुलं ईशान्य भारतात गेली.
आणि सगळ्यांनी सुरुवातीलाच आपला एक कॉमन अनुभव सांगून टाकला. सगळेजण म्हणत होते, तिथली तरुण मुलं आपल्याला चटकन विचारतात, ‘‘तुमच्या भारतात तुम्ही आम्हाला असं का वागवता?’’ हे दोस्त म्हणतात हा प्रश्नच सुन्न करणारा होता. एकतर ‘तुमच्या भारतात’ हा उल्लेख आपल्याला बोचतो. पण त्यातून हेदेखील कळतं की, तुटकपणा  आणि तुटलेपणा त्या माणसात नाही, तर आपणच त्यांना विदेशी समजून चुकीचं वागतो. मोठा बदल आपण कदाचित नाही करू शकत; पण एकेका माणसाशी दोस्ती करत हे तुटलेपण सांधू तर शकतो.’’
हा विश्‍वास या मुलांना ज्ञानसेतूच्या उपक्रमानं दिला. 
आर्किटेक्ट असलेला ओंकार देशमुख तीन आठवड्यांसाठी नागालॅँडला गेला होता. नागालॅँडमध्ये जायचं तर इनर लाइन परमिट घ्यावं लागेल हे कळलं तेव्हा धक्काच बसला असं सांगून तो म्हणतो, ‘शॉकच होता तो, आपल्याच देशाच्या एका भागात जायचं तर परमिट हवं, हे जरा पचलं नाही. पण मग नंतर त्यात काही वेगळं वाटलं नाही ते चटकन मिळालं. पण मग आत गेल्यावरही कायम परमिट तपासणी, सामानाच्या बॅगा चेक होणं हे सारं सुरूच होतं. आणि मग एका शाळेत गेलो. तिथल्या मुलांना विज्ञानाचे प्रयोग शिकवायचे होते. शाळकरी मुलांनी अप्रूपानं पहिला प्रश्न विचारला,‘आप इंडियासे आये हो क्या?’ हा दुसरा धक्का. आपल्याच देशातील चिमुरडी आपल्याला वेगळी समजतात, हे कसं पचेल? मग या तुटलेपणाच्या भेगा हळूहळू नागालॅँण्डमधे सर्वत्र दिसू लागल्या. फटकून वागणं तर होतंच पण पॉप्युलर कल्चरही काही दिसेना. आपल्या बॉलिवूडवाल्यांचे फॅनक्लब दूर परदेशातही हल्ली असतात, त्यांची क्रेझ असते. शाहरूख, सलमानला कोण ओळखत नाही. पण इथे वेगळंच. कोरियन, जापनीज हिरोंचे चित्रपट खूप दिसतात. त्या चित्रपटांतील हिरोंचे पोस्टर तिथे दिसतात. तिकडच्या मुलामुलींना फॅशनेबल राहायलाही खूप आवडतं. प्रत्येकाची हेअरस्टाइल, ड्रेसिंग पद्धत वेगळीच असते. या मुला-मुलींना आपण आपल्या भागात पाहतो तेव्हा अनेक जणांना वाटतं की ही पोरं-पोरी किती नटतात, शहराचं पाणी लागलंय यांनासुद्धा. मुळातच ते नटण्याधटण्याच्या संस्कृतीतच वाढलेली असतात. ते जसे त्यांच्या प्रदेशात राहतात तसेच दुसर्‍या प्रदेशातही. तिथं जाऊन मला कळलं की, आपण आधी त्यांना समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आपली माणसं कळत नाहीत, हा आपला दोष आहे.’’
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणारी ऐश्‍वर्या वाळवेकर. ती गेल्या दोन वर्षांपासून आसाम, मेघालयात जातेय. शिकत असेपर्यंत मी नेमानं ईशान्य भारतात जाणार आणि शिक्षण संपल्यावर तर दोन वर्षं तिथल्या शाळेत मुलांना शिकवायला जाणार, असं ती आवर्जून सांगते. या निर्णयापर्यंत पोहचावं अशी ओढ तुझ्यात कशानं निर्माण झाली असं विचारलं तर ती म्हणाली, ‘तिथं मुलगा-मुलगी असे भेद दिसत नाहीत. शाळेत, वर्गातही मुलं-मुली वेगवेगळे बसलेले मी पाहिले नाहीत. मी त्यांना शिकवत होते तेव्हाच लक्षात आलं की ही मुलं खूप उत्साही आहेत. छोटं काही सांगितलं तरी छान लक्षात राहायचं त्यांच्या. त्या मुलांना फक्त रिसोर्सेस हवेत. तिथल्या दुर्गम भागातल्या अनेक मुलांनी मिक्सर किंवा वॉशिंग मशीन पाहिलेलं नाही हे ऐकून मलाच धक्का बसला. पण जे तुमच्याकडे आहे ते आमच्याकडे तरी कुठाय असं सांगितल्यावर ती मुलं जरा चकित होतात. आम्ही  त्यांना म्हटलं तुमच्याकडे इतका सुंदर निसर्ग, नद्या, झरे आहेत. किती सुंदर आयुष्य आहे. असं काही म्हटलं की दोस्ती होते. आणि त्या दोस्तीतूनच माझ्या लक्षात आलं की, तुमचं-आमचं असा विचार न करता, जर ते सारं ‘आपलं’ वाटलं तर खूप छान होईल. म्हणून तर मी तिथं जायचं ठरवून टाकलंय.   इतकं साधंसरळ निसर्गाच्या जवळचं आयुष्य आहे त्यांचं. फक्त आपल्यासारखी भौतिक प्रगती नाही. मला तर प्रश्नच पडायला लागले की, त्यांच्या सुंदर आयुष्यात विकास म्हणून आपण नक्की काय खुपसणार आहोत? ’ 
जे ऐश्‍वर्याला जाणवलं तेच मुक्तालाही. मुक्ता आठवले. ती  अलीकडेच त्या भागात जाऊन आली. ती सांगते, आपली  आणि त्यांची जीवनशैली वेगळी आहे हे निश्‍चित. शिक्षण-रस्ते-नोकर्‍या-वीज हे प्रश्न आहेत, ते जाणवतात. पण जगण्यात कुठलाच कृत्रिमपणा दिसत नाही. सोप्या पद्धतीनं आयुष्याचा विचार करण्याची पद्धतच मला तिथं समजली. तिथं दिवसच साडेचारला सुरू होतो माणसांचा. सुरुवातीला सहा वाजले तरी आमच्या डोळ्यांवरची झापड जात नसे. पण आपल्यापेक्षा तिकडे लवकर उजेडतं, आपण देशाच्या अतिपूर्वेला आहोत हे हळूहळू लक्षात आलं. आम्ही ज्या कुटुंबीयांबरोबर राहत होतो त्यांची मुलगी रस्त्याने चालता चालता दिसणार्‍या झाडापाल्यातून काहीबाही तोडायची. काय करते विचारलं तर म्हणाली, भाजी करायची या पाल्याची ! मग तिनंच दाखवलं, पक्षी प्राणी टोच मारतात किंवा जी फळं, भाज्या खातात ते सारं आम्ही खातो. ते चविष्टच असतं. मग घरी गेल्यावर तिनं त्या पाल्याची भाजी केली. भाजी म्हणजे नुसता तो पाला उकडला. मीठ, थोडी मिरची घातली. आणि झालं. तरी ते इतकं सुंदर लागलं. निसर्गासोबत राहण्याचं, त्याचा घटक होऊन जगण्याचं हे स्कील आपल्यात उरलेलं नाही, हे पहिल्यांदा जाणवलं. निसर्गातलं होऊन जाणं त्यांना खूप सक्षम बनवतं असंही मला तेव्हा वाटलं.’
इंजिनिअर असलेला प्रवीण प्रयाग, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालॅँण्डमधे काम करणार्‍या ज्ञानसेतू उपक्रमाचा समन्वयक आहे. प्रवीण आत्तापर्यंत पाचवेळा तिकडे राहून आला आहे. तो म्हणतो, ‘आपल्याच देशबांधवांविषयी आपण अविश्‍वास दाखवला, अज्ञान तर अगाधच, तर कशी ती माणसं म्हणतील की आम्ही भारतीय आहोत. एकीकडे आपल्याच कॉलेजात शिकणार्‍या मुलामुलींना बुटकी, चिंकी चिंकी म्हणायचं, हक्का नुडल्स म्हणून चिडवायचं हे किती भयाण आहे. त्यामुळे त्या भागात विकास करण्यापूर्वी आपण आपले अॅटिट्यूड बदलले पाहिजेत. कारण माझा तिथला अनुभव असं सांगतो की, विकास सगळ्यांनाच हवाय. छोटी घरं असतील तिथे, पण त्या घरात टीव्ही पोहचलाय आता. आपले राजकारणी इकडं काय बोलतात त्याचे तिकडेही पडसाद उमटतात. मनं खट्टू करणारा एखादं वाक्यही पुरे ठरतं मग अशावेळी तुटलेपण वाढवायला. हे टाळायचं असेल तर माणसांचा पूल बांधणं, माणसं जोडणं, एकमेकांना ओळखणंच आवश्यक आहे.
सानिका जोशी, अभिषेक अकोटकर, कौस्तुभ देशपांडे या मित्रमैत्रिणींचा अनुभवही असाच. हे तिघेही ईशान्य भारतात जाऊन आलेत. त्यांचा अनुभवही असाच. मात्र एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत की, आपण आपला हा देश समजून घेतला पाहिजे. तिकडून आल्यावर लक्षात येतं की, इथं आपल्याकडे शिकायला आलेली ईशान्य भारतीय मुलं शिक्षण संपलं की मायदेशी परततात. इथल्या चांगल्या संधींचं, बड्या पगारी पैशाचं आकर्षण टाळून अनेकजण परत जातात. काही जण तिथल्याच सरकारी सेवांमधे शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ती कळकळ आपण त्यांच्याजवळ गेल्याशिवाय कळूच शकणार नाही. दोस्तीचा हात आपणच त्यांच्यापुढे केला पाहिजे.
 तुम्ही तिकडून आल्यावर तुमच्या स्वत:त काय बदल झाला, असा प्रश्न या सार्‍या मित्रमैत्रिणींना विचारला तर सगळ्यांनी एकमतानं सांगितलं की, ‘आमची ‘नजर’ बदलली. आपला देश थोडाबहुत कळायला, दिसायला लागला. आणि मुख्य म्हणजे आता ईशान्य भारतीय मुलं भेटली तर ती आपलीच आहे, आपल्याइतकीच भारतीय आहेत हे स्वत:ला सांगावंही लागत नाही. त्यांना कुणी त्रास दिला किंवा त्या भागाविषयी गैरसमज असले तर ते दूर करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो.’
- या बदलत्या ‘नजरांची’, दोस्तीच्या हातांची आणि परस्पर विश्‍वासाचीच तर गरज आहे.
त्यासाठीच तर बांधायला हवेत मैत्रीचे ‘तरुण’ पूल..
 
ईशान्य भारत नक्की आहे कुठं?
ईशान्य भारत असा उल्लेख वाचाल तुम्ही या लेखात, आणि अनेक जणांना प्रश्न पडेल की, हा ईशान्य भारत म्हणजे नेमकी कोणती राज्यं? शाळेत असताना आपण पाठांतरापलीकडे भूगोल वाचलेला नसतो. त्यामुळे आपल्याला आपल्याच देशातल्या सगळ्या राज्यांची नावंही नाही सांगता येत ! तर ते सोडून देऊ आणि समजून घेऊ की ईशान्य भारत म्हणजे नेमकी कोणती राज्यं? 
मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड, त्रिपुरा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांना म्हणतात सेव्हन सिस्टर्स. अर्थात सप्तभगिनी. आणि आठवे आसाम. आसामला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असंही म्हणतात. या भागातल्या माणसांचे चेहरेमोहरे अन्य भारतीय माणसांपेक्षा वेगळे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘विदेशी’ समजण्याची, तसं वागण्याची चूक अनेकजण करतात. हा भाग, ही माणसं आपल्याइतकीच भारतीय आहेत हे कायम लक्षात ठेवायला हवं.
 
प्रत्यक्ष भेटीतून निर्माण होणारं, कनेक्ट आणि कनेक्शन
‘ज्ञानसेतू’ हा उपक्रम सुरू झाला मागच्या वर्षी. ईशान्य भारतासह नक्षलवादी भागात जाऊन शाळकरी मुलांसाठी तरुण विद्यार्थ्यांनीच सायन्स वर्कशॉप घ्यावेत असं या उपक्रमाचं स्वरूप. त्यानिमित्तानं पहिल्यांदाच देशाच्या या कानाकोपर्‍यातल्या भागात विद्यार्थी जातात. आजवर या उपक्रमात सहभागी झालेल्यांपैकी किमान ९५ टक्के मुलं अजून शिकत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही या मुलांना सांगतो की, जिथं जाल तिथल्या माणसांबरोबर राहा. ते जमलं नाही तर त्यांच्या घरी जा, तिथलं जगणं पाहा, गप्पा मारा. त्या प्रवासात ही मुलं आपोआप ते जग जवळून पाहतात. कष्टाच्या, विकास नसलेल्या आयुष्यातही माणसं साधेपणानं किती समाधानानं राहतात हे अनुभवतात. त्यातून तिथले प्रश्न कळतात, विकास न झाल्यानं उद्भवलेल्या समस्या जाणवतात. 
आणि आपोआप त्यातून परस्परांविषयी आपुलकी वाटते. ओढ वाढते. त्या मैत्रीतूनच परत आल्यावर एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत, संपर्क ठेवला जातो. फोन येत जात राहतात, ‘आपली’ वाटतात माणसं एकमेकांना. 
आमचा ज्ञानसेतू हा उपक्रम एक प्रयत्न आहे, एक माध्यम आहे, त्या माध्यमातून माणसामाणसात ‘कनेक्शन’ निर्माण होईल, व्यक्तिगत संपर्क, ओळख आणि आपुलकी निर्माण होईल हाच खरा उद्देश आहे. आजवर या उपक्रमात सहभागी झालेले अनेक मुलं हा अनुभव घेत आहेत, आपुलकी वाढीस लागते आहे, हे महत्त्वाचं.
- विवेक पोंक्षे
मुख्य संयोजक, ज्ञानसेतू उपक्रम, ज्ञानप्रबोधिनी पुणे
 
विद्यार्थ्यांनी ईशान्य भारत पहावा म्हणून केंद्र सरकारची नवीन योजना
ईशान्येत फिरायला जा.
ईशान्य भारताविषयी एवढं अज्ञान का आहे?
कारण त्या भागात कुणी फारसं फिरायला जात नाहीत. माहिती नाही आणि देशाच्या त्या कोपर्‍यात जाण्या-येण्याच्या काही सुविधा नाहीत असा गैरसमजही दूर होत नाही. त्यातून ईशान्य भारताला एक तुटलेपण आलं, एकाकी, अलगथलग पडलेला हा भाग. त्यात तिथल्या लोकांच्या भाषा, चेहरेपट्टी वेगळी. त्यातून हे दुरावलेपण वाढलं. 
हे सारे प्रश्न सुटावेत, ईशान्य भारतीय लोकांशी आणि संस्कृतीशी परिचय वाढावा, तिथल्या लोकांना मिळणारी परकेपणाची वागणूक बंद व्हावी म्हणून केंद्र सरकारनं एक खास योजना राबवण्याचं ठरवलं आहे. देशभरातल्या शाळेतल्या मुलांना जर ईशान्य भारतात जायचं असेल, तो भाग पाहायचा असेल तर त्या खास सहलींसाठी रेल्वेच्या भाड्यात घसघशीत सवलत देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तशी योजनाही ‘आयआरसीटीसी’ अर्थात रेल्वेशी बोलून लवकरच कार्यन्वित होणार आहे. ७0 शाळकरी विद्यार्थ्यांच्या एका तुकडीबरोबर एका शिक्षकाला पूर्णत: मोफत प्रवास करता येऊ शकेल. दहा दिवसांची ही सहल असेल. त्यात रेल्वे प्रवास, स्थानिक प्रवास, साईट सिईंग, राहण्याजेवण्याची सोय असं पूर्ण पॅकेज तयार करण्याचा रेल्वे विचार करते आहे. १0 ते १२ ट्रेनद्वारे ही योजना सुरू करण्यात येणार असून, त्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष कोच आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
हा उपक्रम नव्यानं सुरू होत असला, तरी दिल्ली विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांंसाठी ‘कॉलेज ऑन व्हील्स’ नावाच्या उपक्रमांतर्गत एक खास ‘ग्यानोदय एक्स्प्रेस’ घेऊन ईशान्य भारतात तरुण विद्यार्थ्यांना घेऊन जाते. २0 ते ३0 डिसेंबरच्या दरम्यान यंदाही ‘धरोधर- ग्यानोदय’ एक्स्प्रेस ईशान्य भारतात ९00 तरुणांना घेऊन जाणार आहे. जाण्यापूर्वी त्या भागातल्या भाषा, उच्चार, संस्कृती, खानपान याविषयी तरुणांना पूर्ण मार्गदर्शन देण्यात येतं. कॉलेज ऑन व्हील्सचा हा चौथा उपक्रम आहे.
अशा प्रकारचे उपक्रम वाढीस लागले तर ईशान्य भारताशी जवळीक तर वाढेलच; पण तिथल्या पायाभूत सुविधा वाढतील. विकासाला, पर्यटनाला गती मिळेल, अशी आशा आहे. े
 
 
चर्चेत सहभागी झालेले तरुण मित्रमैत्रिणी : ऐश्‍वर्या वाळवेकर, मुक्ता आठवले, ओमकार देशमुख, प्रवीण प्रयाग, सानिका जोशी, अभिषेक अकोटकर, कौस्तुभ देशपांडे  
छायाचित्र : अनिरुद्ध करमरकर

Web Title: Will Indiawale build friendship bridge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.