कचर्यातून पांढरा कोळसा
By Admin | Updated: May 22, 2014 15:52 IST2014-05-22T15:52:32+5:302014-05-22T15:52:32+5:30
अतुलने बी.टेक केलं, पण वाटलं नोकरी काय करायची? आपण आपल्याच गावात एक व्यवसाय करू. मग उभा राहिला तुर्हाट्या, चिपाड आणि भुशातून एक स्वयंरोजगार.

कचर्यातून पांढरा कोळसा
अतुल आसरकर - त्यानं बी.टेक केलं, पण वाटलं नोकरी काय करायची? आपण आपल्याच गावात एक व्यवसाय करू. तुर्हाट्या, चिपाड आणि भुशातून उभा एक स्वयंरोजगार.
--------------------
आदिवासी बहुल यवतमाळ जिल्हा. आधीच उद्योगांची वानवा. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील दोनशेहून अधिक उद्योग बंद पडले. बाकीही अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. नवीन उद्योजक जिल्ह्यात येण्यास तयार नाहीत. उद्योगासाठी लागणारी जमीन, वीज, पाणी, कच्चा माल अशा पायाभूत सुविधांचीच या भागात कमतरता आहे. ही अशी अवस्था असेल तर या भागातले तरुण मुलं काय म्हणून स्वत:चा उद्योग सुरू करण्याची स्वप्न पाहतील?
पण ज्या वाटेनं कुणी जात नाही, त्या वाटेनं जात आपल्या जगण्यासह इतरांचंही जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न काही जण करतात. त्यातलाच हा एक तरुण. म्हणून तर याच भागातील एका उच्चशिक्षित युवकानं भरभक्कम स्वत:चा एक वेगळाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आसपासच्या काही तरुणांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला.
कशी सुचली आयडिया?
यवतमाळ जिल्ह्यातली शेतीची परवड तशी नेहमीची. निसर्गाचा प्रकोप, शेतमालाला भाव नाही, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्त्या हे चक्रही नेमानं सुरूच आहे. त्यात जिल्ह्यात शेतीला पूरक उद्योग-व्यवसाय नाहीच. अशा परिस्थितीत कचर्याचं सोनं करण्याचा एक स्वयंरोजगार एका युवकानं सुरू केला. त्याचं नाव अतुल रमेशराव आसरकर.
यवतमाळात दर्डानगर परिसरात तो राहतो. त्याच्या कुटुंबात व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. अतुलनंही बी.टेक केलं. परंतु नोकरी करायचीच नाही असं त्यानं ठरवलं होतं. त्याचदरम्यान अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव येथे त्याच्या पाहण्यात एक आगळा-वेगळा उद्योग आला. उद्योग होता शेती कचर्यातून (अँग्रीकल्चर वेस्टेज) व्हाईट कोल (पांढरा कोळसा) बनविण्याचा. अतुलला या व्यवसायाची गरज समजली होती. अधिक माहिती त्यानं इंटरनेटवरून मिळविली. आता मुख्य प्रश्न होता भांडवलाचा. त्यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळाकडे अर्ज केला आणि त्यांनी अतुलला ३५ टक्के अनुदानावर २५ लाख रुपये कर्ज मंजूर केलं. त्याचसोबत एक महिन्याच्या उद्योगासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षणही दिलं.
अतुलनं मग यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मेंढला शिवारात असलेल्या स्वत:च्या शेतीत उद्योग थाटला. त्यासाठी १७ लाख रुपयांची यंत्रसामग्री विकत घेतली. आणि कृषी कचर्यातून उद्योग सुरू केला. उद्योगाचे नाव आहे ‘साई शक्ती अँग्रो ब्रिक’ सरळ सांगायचं झाल्यास शेती कचर्यातून पांढरा कोळसा (व्हाईट कोल) बनविण्याचं हे काम. या व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतीतून निघणारा जो कचरा शेतकर्यांना फेकून द्यावा लागतो तो कचराच या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. तुर्हाट्या, पर्हाट्या, उसाचा बगास, आराममशीनमधून निघणारा भुसा, शेंगांची टरफलं याच वस्तूंपासून पांढरा कोळसा बनविला जातो. उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाशिवाय हा व्यवसाय करता येतो. हा कच्चा माल सहज उपलब्ध होतो. तसेच या कचर्याचे शेतकर्यांनाही दोन पैसे मिळतात. हा शेती कचरा गोळा करण्यासाठी अतुलनं परिसरातील ४0 युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. तसेच प्रत्यक्ष मशिनरी चालविण्यासाठी १५ लोकांना नियुक्त केलं आहे. अशा प्रकारे या कामातून ५५ ते ६0 लोकांना रोजगार मिळाला. या उद्योगातून तयार होणारा माल मुंबई, पुणे व औरंगाबाद येथे बॉयलरचे काम चालणार्या उद्योगांमध्ये पाठविला जातो. फूड इंडस्ट्री, गारमेंट, थर्मल एनर्जी, पेपर मिल्स्, सोया प्रकल्प आदि ठिकाणी या पांढर्या कोळशाला मागणी आहे. कोणत्याही प्रकारचं प्रदूषण हा कोळसा जळताना होत नसल्यामुळे केंद्र सरकारची ‘कार्बन क्रेडिट सबसिडी’सुद्धा या उद्योगाला मिळते.
‘महिन्याला तीनशे टन माल आम्ही ट्रान्स्पोर्ट कंपनीद्वारे पाठवतो. सध्या ३२00 ते ३३00 रुपये प्रतिटन भाव सुरू आहे. यामध्ये उत्पादन खर्च प्रतिटन ९00 रुपये येत असल्याचं’ अतुल सांगतो.
अडचणी काय आल्या?
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये चांगलेच खेटे मारावे लागले. प्रदूषण विभाग, तहसील कार्यालय, वीज कंपनी, ग्रामपंचायत, तलाठी अशा विविध कार्यालयांच्या एनओसी, परवानग्या, कागदपत्रांची पूर्तता करता-करता पुरेवाट झाली. पण काम सुरूच करायचं होतं म्हणून संयम ठेवला. त्या संयमानं तारुन नेलं असं अतुल सांगतो.
सध्या उद्योग सुरळीत सुरू असला तरी सर्वात मोठा अडसर वीज कंपनीकडून भारनियम व कमी दाबाच्या वीजपुरवठय़ाचा आहे. त्यावर उपाय म्हणून आम्हीच बायोमासपासून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय. त्यापासून १00 एचपी वीजपुरवठा होऊ शकेल. हा वीजपुरवठा माझ्या उद्योगाला पुरेसा आहे. आपण आपल्या प्रश्नांवर तोडगे शोधावेत, असंही अतुल सांगतो.
लक्षात काय ठेवायचं?
१) आपल्याला जो व्यवसाय सुरू करायचा त्याविषयी पूर्ण माहिती, अभ्यास हवा.
२) अडचणी येतात, त्या संयमानं सोडवायच्या.
३) धरसोड केली नाही, तर व्यवसाय हळूहळू का होईना बाळसं धरतोच हे लक्षात ठेवायचं.
- सुहास सुपासे,यवतमाळ