ठळक मुद्देशहराचे तुकडे आणि सांधे जमवत. त्यातून उभं राहिलं एक नाटक ! त्याचं नाव ठेवलं ‘सिटी : फ्रॅग्मेण्टेड मोमेण्ट’.. म्हणजे  ‘शहर - तुट के क्षण’!

-ऑक्सिजन टीम

कॉलेजातली कुठलीही असाइनमेण्ट म्हणजे काय असते?
- डोक्याला ताप. मार्कासाठी प्रेझेंटेशन आणि प्रेझेण्टीसाठीची सक्ती! कटकट ! प्राध्यापकांचा जाच आणि त्रास!
- एरव्ही तमाम कॉलेजातल्या तमाम मुलामुलींना कुठल्याही असाइनमेण्टविषयी ‘हे’ आणि ‘असंच’ वाटतं. सगळा जुलमाचा रामराम. मुलं आपसांत बोलतातही, कसलं रे बोअर, त्याचा काही उपयोग नाही.
आणि काही उपयोग नाही म्हणून आधीच्या वर्षाच्या मुलामुलींचे प्रोजेक्ट ढापणं, कॉपी मारणं,  इंटरनेटवरून कॉपी पेस्ट करणं, कुणाला तरी पैसे देऊन चक्क प्रोजेक्ट करवून घेणं, विकत घेणं हे सगळे उद्योग सर्रास केले जातात.
मात्र नाशिकच्या विद्यावर्धन या संस्थेच्या आयडिया (इन्स्टिटय़ूट फॉर डिझाईन एन्व्हार्यनमेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर) कॉलेजातल्या तरुण मित्रमैत्रिणींना भेटा, त्यांचा अनुभव वेगळा आहे आणि त्या खास  ‘अनुभवा’चं नाव आहे ‘सिटी र्‍ फ्रॅग्मेण्टेड मोमेण्ट’.. म्हणजे ‘शहर - तुट के क्षण’
आर्किटेक्ट होऊ घातलेल्या या मुलांची नजरच या प्रोजेक्टने पालटून टाकली.
या कॉलेजमध्ये एक ते पाच अशा प्रत्येक वर्षातल्या मुलामुलींना एकत्र करून त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स बनतात. खालून वर असे ज्युनिअर-सिनिअर्सचे ग्रुप्स. म्हणून त्याचं नाव ‘व्हर्टिकल स्टुडिओ’! प्रत्येक ग्रुपला एकेक असाइनमेण्ट आणि त्यासाठी एकेक तज्ज्ञ मार्गदर्शक दिला जातो. त्यातून या मुलांनी काही शिकावं, घडवावं अशी अपेक्षा असते. तो प्रोजेक्ट करण्याची प्रोसेस अनुभवावी म्हणून हा उपक्रम असतो.
यंदा त्या उपक्रमाची थीम होती शहर. आणि 26 जणांच्या या ग्रुपला शहर कसं दिसतं हे पहायचं, शोधायचं, अनुभवायचं होतं.
आर्किटेक्ट होऊ घातलेली मुलं, त्यांना शहर म्हटल्यावर काय दिसलं असतं?- इमारती आणि रस्ते, मोकळ्या जागा आणि बांधलेल्या भिंती.?
हे सारं तर त्या मुलांना दिसलंच; पण त्यांना जे जग दिसलं त्यापलीकडचं काहीतरी त्यांना दाखवायला, त्यांच्याबरोबर शोधायला नाटककार अतुल पेठे नावाचा एक वाटय़ाडय़ा त्यांना भेटला. तोही निघाला या तरुण मुलांसोबत शहर पाहत. शोधत, शहराचे तुकडे आणि सांधे जमवत.
त्यातून उभं राहिलं एक नाटक ! त्याचं नाव ठेवलं ‘सिटी : फ्रॅग्मेण्टेड मोमेण्ट’.. म्हणजे  ‘शहर - तुट के क्षण’!
आणि आर्किटेक्चर कॉलेजच्या मुलांनी स्वतर्‍च लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे प्रयोगही त्यांच्याच कॉलेजच्या आवारात केले. नाशिक शहरातल्या नाटय़प्रेमींनी त्यासाठी मोठी गर्दी केली, आणि थक्क होऊन या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.
काय होतं ते नाटक? (पुढे चौकट पहा.) ते कसं झालं? नाटक करण्याइतपत शहर पाहण्याची आणि दिसण्याची या मुलांची प्रोसेस काय होती?
ते समजून घेण्यासाठी ‘ऑक्सिजन’ने या मुलांशी गप्पा मारल्या.
‘शहर काय असतं? हे आम्हाला पहिल्यांदाच दिसलं ’- एक मुलगा चटकन म्हणाला, ‘आम्ही आर्किटेक्टरचं शिक्षण घेतो त्यामुळे आयडिया ऑफ प्लेस- म्हणजे एकूण अवकाशाची जाणीव आम्हाला असते. आम्ही ते शिकतोच. पण या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही त्यापलीकडे शिकलो. पहिल्यांदाच कळलं की शहर बाहेर नाही, आपल्या आतही आहे. ती जागा आपल्याशी बोलते, आपल्याला कुठं ऐकू येतं? त्या जागेशी आपल्याला बोलायचं असतं, आपण बोलतोही ते तरी आपल्याला कुठं समजतं? अवतीभोवतीचं शहर आपल्याला दिसत नाही. हे आजवर ‘न दिसलेलं शहर’ पाहायला शिकलो आम्ही!’
आणि ते कसं शिकलात असं विचारण्यापूर्वीच ग्रुपमधली एक हसरी मुलगी म्हणाली, ‘आधी आम्ही आमच्याकडे पहायला शिकलो. आम्ही आमच्याकडे तरी कुठं पाहत होतो? आम्ही कसे दिसतो, कसे चालतो, बोलतो हे सारं इतरांच्या नजरेतून चाललं होतं. अमुक असंच करायचं, तमुक तसंच करायचं असं म्हणत जगत होतो. पण आम्हाला काय आवडतं, सुचतं, दिसतं, जे दिसतं ते स्वतर्‍शी तरी मान्य करायला हवं, जे करायचं ते केवळ सक्ती म्हणून नाही तर स्वतर्‍च्या आनंदासाठी करायचं असतं, हे आम्ही पहिल्यांदाच शिकलो.’
ते या मुलांना शिकवलं अतुल पेठेंच्या कार्यशाळेतल्या अगदी छोटय़ा प्रयोगांनी.
या मुलांनी फुलं बनवली. अवतीभोवती दिसणार्‍या गोष्टींची चित्रं काढली. सगळे जरा निवांत बसले. एकच जागा वेगवेगळ्या पद्धतीनं कशी दिसते हे पाहिलं. आपल्यासह आपल्या मित्रांचाही अ‍ॅँगल समजून घेतला! कॉलेजात पहिल्यांदाच स्वतर्‍विषयी, आपल्याला काय वाटतं याविषयी मोकळेपणाने बोलायची संधी सगळ्यांना मिळाली. प्राध्यापकांशी पहिल्यांदाच अभ्यासापलीकडच्या गप्पा झाल्या. मुलांनी स्वतर्‍त काही बदल केले, काही घोळ मान्य केले! ‘आपल्याला काय वाटतं हे कुणाला तरी महत्त्वाचं वाटतं आहे, ते कुणीतरी ऐकून घेतं आहे’ हा अनुभवच नवा होता. पहिला होता. 
एक दोस्त म्हणाला, ‘शहर काय असतं, जागा काय बोलतात, आम्हाला हे तरी कुठं माहिती होतं की आम्हाला नेमकं काय पाहिजे? स्वतर्‍ला काय पाहिजे? आम्ही काहीही करताना विचार करायचो की कोण काय म्हणेल, हे बरं दिसेल का, हे रुचेल का, हे इतरांना आवडेल का? या प्रश्नांची भीतीच फार वाटायची. आणि मग बिचकत बिचकत आम्ही काहीतरी करायचो; पण ते करण्यात मजा येत नव्हती. आपण जे करतो त्यात मजा येते म्हणजे काय होतं, आपण शिकतो म्हणजे नक्की काय होतं याचा अनुभव आम्हाला या प्रोजेक्टनं दिला.’
त्याला दुजोरा देत त्याचा मित्र म्हणाला, ‘एक हॅपी विंडो सापडली आम्हाला. आमच्यातच दडलेली अशी एक खिडकी जी आम्हाला माहितीच नव्हती. आपण जे शिकतो, जे करतो त्यात मजा येते, आपण ते आपल्यासाठी करतो, मार्क, शिक्षक आणि प्रेझेण्टीसाठी नाही हे पहिल्यांदाच समजलं. कारण आम्ही एक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं पाहिली, त्यातून आम्हाला पाहणं आणि दिसणं यातला फरक कळला. इतके दिवस आम्ही अनेक गोष्टी पाहत होतो, आमचं शहर पाहत होतो, पण आम्हालाही काही गोष्टी ‘दिसत’ नव्हत्या, त्या आता दिसायला लागल्या. आपण फोनवर बोलत रस्त्यानं जातो, अनेकजण जातात, ते काय बोलतात आपल्याला दिसत नाही, ऐकू येत नाही. आपण इतके ‘इनडिफरण्ट’ असतो की नुस्ते बघे असतो. आत काही पोहचत नाही. कधी प्रश्नच पडला नाही की, आपलं शहर नक्की कसं जगतं? या प्रयोगाच्या दृष्टीनं आम्ही शहराची बारीक निरीक्षण केली. त्या नोंदी ठेवल्या. त्यातून आमचा आत्मविश्वास वाढला.’
- हे मित्रमैत्रिणी सांगत होते शहर पाहण्याची आणि आत्मविश्वास वाढण्याची गोष्ट. पण शहर पहायला ते कॉलेजच्या चार भिंती सोडून कुठं बाहेरही गेले नाहीत. त्यांनी त्यांनाच माहिती असलेलं शहर पुन्हा ‘अनुभवलं’.
बोलताबोलता एक मैत्रीण पटकन म्हणाली, ‘आजवर माझ्या आयुष्यात फार दुर्‍ख असं कधी आलंच नाही. त्यामुळे ‘वेदने’शी माझी ओळख नव्हती. मला रडायचं होतं या नाटकात; पण मला रडूच यायचं नाही. शेवटी एक सणसणीत फटका बसला माझ्या पाठीवर, तेव्हा कळलं मला, वेदना काय असते. अपमान काय असतो!’

एक मैत्रीण म्हणाली. ‘खरं सांगू, आम्ही जे कधीच केलं नाही ते या कार्यशाळेत केलं. आम्ही स्वतर्‍ला शोधलं. शहर नंतर दिसलं, आधी आमचे आम्ही स्वतर्‍ला दिसायला लागलो. पहिल्यांदाच स्वतर्‍वर विश्वास ठेवायला शिकलो. प्रश्न विचारायला शिकलो की, आपण हे सगळं का करतो आहोत. व्हाय? आम्हाला आमच्या जगण्याचा ‘व्हाय’ सापडला या कार्यशाळेत! आता तो आम्ही हातातून निसटू देणार नाही. इतके दिवस खाली मान घालून जे समोर आलं ते शिकलो; पण आता स्वतर्‍हून शिकताना, पाहताना भेटलेली  प्रत्येक गोष्ट, माणूस, परिस्थितीला विचारू की व्हाय? आणि स्वतर्‍लाही विचारूच की, व्हाय! आमच्याकडे आमचे फोन नव्हते. ना आम्ही सतत व्हॉट्सअ‍ॅप चेक केलं, ना कुणाशी बोललो. पण हातात मोबाइल असून, जी कनेक्टिव्हीटी आम्हाला सापडत नव्हती, तो ‘कनेक्ट’ स्वतर्‍शी, इतरांशी, या शहराशी आम्हाला सापडत गेला.’
या सगळ्यांनी पहिल्यांदाच आनंदानं काही गोष्टी नव्यानं केल्या. ज्या अगदी साध्या होत्या. मनापासून ओरडले सगळे, नाचले, गायले, शिव्या दिल्या, मोकळं सोडलं स्वतर्‍ला. विचारांना.. आपण स्वतर्‍ला ओळखतो, इतरांना ओळखू, त्यांचा हात धरू, बोलू त्यांच्याशी असं पहिल्यांदाच वाटलं.. आणि त्या वाटण्यातून या मुलांना शहर सापडत गेलं.
- त्यातून उभं राहिलं त्यांचं नाटक !
त्या नाटकाचे प्रयोग आता ते करणार नसले तरी त्यांनी त्यांच्या ग्रुपचं नाव आणि त्याची थीम जी ठेवली होती, ती आता आपल्यासोबत कायम राहील असं ही मुलं मनापासून सांगतात ! त्यांच्या ग्रुपचं नाव त्यांनी ठेवलं होतं. रानट्री!
आणि त्याची थीम होती.. वेडय़ासारखे वागू!!
पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जात, वेडय़ासारखं वागून, स्वतर्‍ला मोकळं सोडून या मुलांनी जे कमावलं ते आपल्या शिक्षणव्यवस्थेत रोज नसतं. शोधणं, पाहणं, आत मुरवणं, व्यक्त होणं, नवं काही साकारणं आणि साकारलेलं पुन्हा जगाशी ताडून पाहणं असं काही नसतं.
शिकण्याची ही नवी रीतच या मुलांना सापडली आहे!
- आणि त्यांच्या ‘व्हाय’चं उत्तर!!

*****************

आपण काहीतरी शोधतोय, त्यातून आकार घेतं आहे, नवीन काही घडतं आहे

 हे दिसायला लागलं की मजा येते. ती महत्त्वाची! - - अतुल पेठे ज्येष्ट रंगकर्मी

प्रत्येकाकडे काहीना काहीतरी सांगण्यासारखं आहे, अनुभव आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.
माझ्या हातात माइक आणि माझंच ऐक ही माझी शिकण्या-शिकवण्याची पद्धत नाही. त्यामुळे मी जेव्हा या कॉलेजात शिकणार्‍या तरुण मुलांना भेटलो, तेव्हा त्यांना म्हटलं आपण छान गोल करून जमिनीवर बसू,  गप्पा मारू, डायलॉग करू !
मुळात आपल्यालाच फक्त अक्कल आहे आणि त्यामुळे समोर बसणार्‍यांना मी उपदेशाचे डोस देईन, काहीतरी शिकवीन असं काही माझ्या मनात नव्हतं. तसं मी त्या मुलांना सांगितलंही, की मीपण तुमच्यासोबत इथं शिकणार आहे, काहीतरी शोधणार आहे. आपण करून बघू काहीतरी. त्यामुळे शिकणं-शिकवणं वेगळं झालं. आपल्याकडची जी शिकवण्याची पद्धत आहे की, मी शिक्षक आहे तर मीच शिकवणार, मीच बोलणार, माझ्याकडे डिग्री आहे तर मी तुम्हाला शिकवायला मुख्त्यार आहे, ही पद्धतच मला मान्य नाही.
माझ्यसमोर तरुण मुलं बसलेली होती. त्या मुलांची भाषा बदललेली आहे, त्यांचे अनुभव वेगळे आहे. ते त्यांच्यासोबत शिकणं, काही शोधणं आणि जे काही तयार होईल ते जास्त क्रिएटिव्ह असेल असं मला वाटतं.
- याच वाटेनं आम्ही गेलो. मुलांकडून अमुकच करून घ्यायचं, ते तमुकच पद्धतीनं करायला हवं अशी काही ब्लू प्रिण्ट माझ्याकडे नव्हती. मुलं बोलत होती, त्यांच्या नजरेतून गोष्टी सांगत होती.
मी त्यांना म्हणत होतो बोला.
ते बोलत होते, मी ऐकून घेत होतो.
त्याचीच तर ही कार्यशाळा होती. त्यातून ते काही शिकत होते, तसं मलाही सारं नवीन होतं, मीही शिकत होतो. त्यातून जे काही तयार झालं त्यात फार फार मजा येत होती.
माणसं एकत्र काम करतात, त्यांची दखल घेणं. त्यांच्याकडे बुद्धी आहे, सर्जनशीलता आहे, त्यावर विश्वास ठेवणं हे मला महत्त्वाचं वाटतं. समोरच्याला बुद्धीच नाही आणि आपण त्याला आता शिकवू असं वाटणं हे सूत्र, ही पद्धतच मला मान्य नाही.
मी असं एकतर्फी शिकवत नसल्यानं कदाचित मुलांनाही छान वाटलं असेल. त्या शिकण्यातून एक दृष्टी मिळत असेल तर ते चांगलं आहे.
अर्थात ही दृष्टी फक्त त्यांनाच मिळते आहे आणि मी त्यांना शिकवून चाललो आहे असं काही माझं मत नाही. मीही नवी दृष्टी त्यातून कमावतो, काहीतरी शिकून परत जातो असंच मला वाटतं.
ज्ञानाचा मक्ता फक्त माझ्याकडे आहे, असं मला वाटत नाही.
त्यामुळे तीन दिवस कॉलेजातल्या या तरुण मुलांबरोबर दंगा करताना, खातापिताना, नाचताना मलाही मजा आली. त्यांच्यासाठी जशा नवीन खिडक्या उघडल्या तशा माझ्यासाठीही उघडल्या.
हे मजा येणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत आपण काहीतरी शोधतोय, त्यातून काही सापडतं आहे, आकार घेतं आहे, नवीन काही घडतं आहे हे दिसायला लागलं की अधिक मजा येते.
शिकण्या-शिकवण्यातली ही मजा खिडक्या उघडायला मदत करते!
ही मजा महत्त्वाची!

*************

सिटी : फ्रॅग्मेण्टेड मोमेण्ट

ही शहरांची गोष्ट आहे. आपल्या अवतीभोवतीचं, बदलणारं, न बदललेलं शहर. ताणतणाव, एकेकटंपण, खायला उठणारं नैराश्य, बोलायलाच कुणी नसलेलं एकाकीपण. मोबाइलची कनेक्टिव्हिटी आणि एकल आक्रोश, नुसती वचवच, बडबोलेपण, ठणाणा संगीत, धार्मिक ताण, मनातला संताप, संतापाला चढलेले श्रेष्ठ-नीचतेचे वर्ख, गरिबी, लाचारीचे काही तुकडे. श्रीमंतीचे काही सूर, काही शांत स्वर, बदलत्या जागतिकीकरणात बदलणारे व्यवहार, कचर्‍याचे ढीग, कचरा करणार्‍यांचं आणि उचलणार्‍यांचं आयुष्य आणि असं बरंच काही शहरात जे जे घडतं.
जे जे दिसतं ते सारं म्हणजे या मुलांनी तीन दिवसात उभं केलेलं नाटक नव्हे वास्तव आहे शहरी तुकडय़ा तुकडय़ात जगणार्‍या आयुष्याचं !
ते तुकडे एकसंध आहेत आणि काही आरपार तुटत चाललं आहे. काही भिरकावलं जातं आहे आणि काही तुटण्यापूर्वीच सावरायची गरज आहे.
त्या सार्‍याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे!
- ती एक अनुभवण्याचीच गोष्ट आहे !!
**


सहभागी विद्यार्थी

पिनाक पांचानी, इशा डोळस, मितेशा म्हसाणे, सुजित पाटील, अनिकेत पाटील, विशाल फड, प्राजक्ता होले, तनिश ओस्तवाल, चेतन विसपुते, सिद्धार्थ पटेल, ऋतुजा जोशी, नेहा भोईर, धिरेन सुराणा, रुपेश दासी, श्रद्धा बुरा, अपूर्वा देसले, साक्षी पीडियार, अनघा देशपांडे, निशा कोचर, तन्वी मोहिते, प्राजक्ता रहाणे, आस्था याज्ञिक, धनश्री सोनवणे, श्रीराज देवघरे, नीलेश बोरस्ते, सोहेल अन्सारी.

 

**************

हे नाटक इथे पाहा..


नाशिकच्या विद्यावर्धन या संस्थेच्या आयडिया या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या व्हर्टिकल स्टुडिओ या उपक्रमांतर्गत शहर या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. त्यासाठी प्रथम ते पाचव्या वर्गात शिकणार्‍या 26 मुलांचा एक ग्रुप असे गट केले होते. एका गटाचे मार्गदर्शक नाटककार अतुल पेठे होते. त्या चार दिवसांत त्यांनी मुलांबरोबर चर्चा, गप्पा आणि संवादाबरोबर काही  एक्सरसाइजेस  केले. त्या घुसळणीतून शहर कसं दिसतं, हे तपासून पाहिलं. एक अनोखं नाटक त्यातून उभं राहिलं आणि ते अशा मुलांनी केलं ज्यांनी कधीही नाटकात काम केलेलं नव्हतं. त्यापैकी अनेकांनी तर कधी स्टेजवर जाण्याचं डेअरिंगही केलेलं नव्हतं. तरी या मुलांनी एकत्र येऊन हे नाटक केलं.
जे शहरी जगण्याचे तुकडे मांडतं.
हा सारा प्रयोग मुलांच्या अभ्यासाचा भाग होता त्यामुळे आता त्याचे प्रयोग होणार नाहीत. मात्र हे नाटक इथं  पहा ..

Web Title: When the windows open! A unique learning experience in Nashik's 'Idea' architecture college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.