When a mechanical engineer works on water dispenser in his village | मेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा पाणीप्रश्नावर काम करतो .
मेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा पाणीप्रश्नावर काम करतो .

-स्वप्नील अंबुरे 
(निर्माण 8 )

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वीरवडे हे माझं गाव. गावात काम नसल्यामुळे आणि शेतीतून हातात काहीच येत नसल्यामुळे वडिलांनी गाव सोडलं होतं. माझं शालेय आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्याला झालं. शाळेत मी विज्ञान व गणित यात खूप रमायचो. लहान असताना मी खूप विज्ञानाचे प्रयोग करत बसायचो. आमच्या घरात मशीन डिझाइनचं एक भलंमोठं पुस्तक होतं. मी नववीत असताना ते चाळत बसायचो. त्याचवेळी मी ठरवलं होतं की आपल्याला इंजिनिअर व्हायचं, त्यातही फक्त मेकॅनिकलच. आधी डिप्लोमा पूर्ण केला आणि  मग डिग्री करायची असं ठरवलं. डिग्रीला नवीन आधुनिक मेकॅनिकल तंत्रज्ञान शिकायला मिळेल असं मला वाटलं; पण माझा भ्रमनिरास झाला. जे डिप्लोमाला शिकलो तेच पुन्हा डिग्रीला. त्यामुळे मला काहीच अभ्यास करावा लागला नाही. आजही इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम तसाच जुनाच आहे. थर्मल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाइल हे माझे आवडीचे विषय. 

इंजिनिअरिंगला असताना माझं मन कॉलेजच्या बाहेरच्या विश्वात रमू लागलं. वाचन वाढलं. गांधी, आंबेडकरांपासून ते रसेल, जे. कृष्णमूर्ती इ. सुरुवातीला वाचनात आले. वाचून, प्रवास करून, लोकांना भेटून आजूबाजूचे प्रश्न मला समजायला लागले. खूपच अस्वस्थ व्हायचो. आजही होतो. त्यानंतर डॉ. दाभोलकर, संदीप वासलेकर, डॉ. अभय बंग, अतुल देऊळगावकर, महेश एलकुंचवार यांचं लिखाण वाचनात आलं. अस्वस्थ झालो. ही  अस्वस्थताच मला काम करण्याची ऊर्जा देते नेहमी.

2016 ला इंजिनिअर झालो. चांगला पगार असलेल्या जॉबचे अनेक पर्याय उपलब्ध होते; पण फक्त आर्थिक निकषावर निर्णय न घेता माझ्या आंतरिक समाधानासाठी व सामाजिक गरज कुठे आहे या निकषावर मी निर्णय घ्यायचं ठरवलं. त्यामुळे काय करायचे नाही हे मी आधी ठरवलं. त्यामुळे खूप ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. कंपनीत नोकरी करायची नाही हे मी ठरवलं होतं. घरच्यांचा विरोध झाला. ते साहजिकच होतं; पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. माझी इंजिनिअरिंगची कौशल्ये वापरून मला कुठला सामाजिक प्रश्न सोडवता येईल याचा विचार करू लागलो. 2013-16 महाराष्ट्रात सलग दुष्काळ पडला. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत गेले. खूपच अस्वस्थ व्हायचो. त्याचवेळी मी जगभरात आज कुठला विषय महत्त्वाचा आहे की त्यावर काम करता येईल याची एक यादी तयार केली. नॅनो तंत्नज्ञान, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, जलतंत्रज्ञान आणि अशाप्रकारचे 9 विषय त्यात होते. महाराष्ट्राची सामाजिक व पर्यावरणीय गरज लक्षात घेता आणि माझी इंजिनिअरिंगची कौशल्ये व क्षमता यांचा विचार करता मला जलतंत्रज्ञान (अर्थात जलस्वराज्य) यांचा मेळ दिसला. त्याच सुमारास पुणे विद्यापीठात डिझाइन इनोव्हेशन सेंटर सुरू झालं होतं. त्यामध्ये पाणी या प्रश्नावर एक अभ्यासक्रम होता. Advanced and innovative techniques in Watershed and Environment   असा तो अभ्यासक्र म. त्याला मी प्रवेश घेतला. त्यावेळी मी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप प्रवास केला.
मग निर्माणमध्ये सहभागी झालो. झुंज दुष्काळाशी शिबिराअंतर्गत पाणलोटाचे अनेक उपचार आम्ही स्वत: कृती करून शिकलो. अभ्यासक्रम पूर्ण झाला. आता कुठं काम करावं या संभ्रमात असतानाच छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात आर्शमशाळेसोबत काम करण्याची संधी मिळाली. एक महिना काम केल्यानंतर नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे घरच्यांनी मला पुन्हा जाऊ दिले नाही. त्याचवेळी पानी फाउण्डेशनमध्ये तांत्रिक प्रशिक्षक म्हणून जागा आहेत असं समजले.  निवड प्रक्रि येचे वेगवेगळे टप्पे पार करत मी जॉइन झालो.

निर्माणचं शिबिर झाल्यानंतर माझं पानी फाउण्डेशनमध्ये काम सुरू झालं. सुरुवातीला माझं  पाणलोटच्या शास्रीय पद्धती (फिल्ड वर्क) व एक प्रशिक्षक म्हणून ट्रेनिंग झालं. 

2018 मध्ये मी पश्चिम महाराष्ट्रात काम केले. मी व आमच्या टीमने खटाव, माण व इंदापूर तालुक्याला ट्रेनिंग दिले. या 3 तालुक्यांतील 98 गावांतील 550-600 गावकर्‍यांना मी व आमच्या टीमने प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षक म्हणून काम करताना अनेक छोट्या छोट्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. शांतपणे प्रश्नांची उत्तरं देणं, देहबोली, आवाजातील चढ-उतार, परस्परसंवादी सत्र घेणं, गावकर्‍यांच्या आतल्या बदलणार्‍या प्रवासावर बारीक लक्ष ठेवणे इ. गावकर्‍यांचे अनुभव आणि त्यानुसार त्यांचे प्रश्न खूपच विचार करायला भाग पाडतात.
गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यात आणि यावर्षी उत्तर महाराष्ट्रातील चांदवड तालुक्यात मी काम केलं. 
तांत्रिक प्रशिक्षक असल्यामुळे सतत वेगवेगळ्या भागात फिरावं लागतं आणि ते मला खूप आवडतं. कारण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या चारही विभागातील काम या दोन वर्षांत मी बघितलं आहे, अभ्यासलं  आहे. त्यातून मला खूप शिकायला मिळालं. अनेक चांगले-वाईट अनुभवही आले. मला महिलांचे योगदान खूप जास्त दिसून आले. अनेक गावांतील चळवळ ही महिलांनी-मुलींनी उभी केली आहे. कित्येक महिला आहेत ज्यांनी सगळं घर सांभाळून उन्हातान्हात उपचारांची आखणी केली,श्रमदान केलं,  ग्रामसभा घेतल्या. ज्या पद्धतीने महिला घराबाहेर पडून काम करत होत्या हे पाहून मला खूपच भारी वाटायचं.

पाणीप्रश्नावर माझं काम करणं आणि टिकून राहणं किती महत्त्वाचं हे मला यावर्षीच्या दुष्काळानं चांगलंच शिकवलं. असाच एक अनुभव आहे की, कुंदलगाव नावाच्या गावातील सगळे गावकरी एका अंत्यविधीसाठी जमले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू होता आणि गावात पाण्याचा टँकर आला. निम्मे लोक पाणी भरण्यासाठी गेले. किमान गावात तरी मी असं कधी बघितलं नव्हतं. ही गोष्ट मनाला चटका लावणारी होती.

पाणी ही समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येतंच. भविष्यात मला मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माती आणि पाणी संवर्धन आणि वॉटर बजेट यावर काम करायचं आहे. पानी फाउण्डेशनव्यतिरिक्त माझे पाणीप्रश्नावर काम चालूच असते. काम करत असतानाच मी माझी कौशल्ये वाढविण्यासाठी अँक्वाडाम या संस्थेत भूजल या विषयावर ट्रेनिंग घेतले. सध्या मी ग्राउण्ड वॉटर सव्र्हेज आणि डेव्हलपमेण्ट एजन्सी सोबत पाण्याचा पदभार आणि  पाण्याचा ताळेबंद यावर काम करत आहोत. डिमांड मॅनेजमेंटवर काम करत आहोत. जलव्यवस्थापन व उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर हे आमच्या कामाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, इंजिनिअरिंगला असताना मी व सुरेंद्र नावाच्या मित्नाने मिळून कचर्‍यावर  प्रक्रि या करण्याचा प्रोजेक्ट केला होता. तो प्रोजेक्ट आम्ही स्टार्टअपसाठी अर्ज केला होता. भारतातील 25 स्टार्टअपमध्ये त्याची स्टार्टअप हबसाठी निवड झाली आहे. सध्या सुरेंद्र त्यावर काम करत आहे. 

एकूण काम करत असताना खूपच समाधान वाटतं. अशाप्रकारचं काम निवडल्यापासून माझा आजूबाजूच्या वातावरणात जाणूनबुजून काहीजणांकडून भीती व असुरक्षितता निर्माण केली जाते, त्याकडे दुर्लक्ष करून व त्यावर मात करून गोताखोर बनावं लागतं आहे. अर्थात, आता आईवडिलांचा सपोर्ट आहे. आणि मी स्वत:ला सांगतोय की,  मै गोताखोर, मुझे गहरे जाना होगा..   

------------------------------------------------------

निर्माणमध्ये सहभागासाठी.

अर्थपूर्ण जीवनाचा कृतिशील शोध सुरू  असणार्‍या युवक-युवतींसाठीचा एक समुदाय म्हणजे ‘निर्माण’. महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडविणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी निर्माण हा युवानिर्मितीचा उपक्रम सुरू केला आहे.
निर्माणची दहावी बॅच येत्या जानेवारीमध्ये (2020) सुरू होत आहे.
त्यात सहभागी होण्याची इच्छा असेल, तर  http://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाउनलोड करता येईल. अधिक माहितीही याच वेबसाइटवर उपलब्ध आहे.
    

ambureswapnil@yahoo.com

Web Title: When a mechanical engineer works on water dispenser in his village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.